रस्त्यांची कामे नीट न केल्यास कारागृहात जाण्याची सिद्धता ठेवा !

नाशिक महापालिका आयुक्तांची ठेकेदारांना चेतावणी

नाशिक महापालिका

नाशिक – मुंबई महापालिकेने रस्त्यांची निकृष्ट कामे केल्याप्रकरणी काही ठेकेदारांसह २ अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली. त्यामुळे संबंधितांना कारागृहांत जावे लागले. त्याप्रमाणे नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा सांभाळण्यासमवेत त्यावरील चेंबर्स, दुभाजकांची रंगरंगोटी आणि अन्य कामे वेळेत न केल्यास मुंबई महापालिकेप्रमाणे ठेकेदारांनी कारागृहात जाण्याची सिद्धता ठेवावी, अशी चेतावणी महापालिकेचे आयुक्त, तसेच प्रशासक रमेश पवार यांनी १३ मे या दिवशी ठेकेदारांना दिली आहे.

१. गेल्या २ वर्षांत जवळपास ६०० कोटी रुपयांहून अधिक निधी रस्त्यांवर व्यय झाला आहे. ४५० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे नुकतेच आदेश दिल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तांनी प्रमुख ठेकेदारांची बैठक घेतली.

२. या बैठकीत ठेकेदारांच्या तक्रारीवजा सूचना जाणून घेतल्या. त्यानंतर आयुक्तांनी ‘निविदा प्रक्रियेत निश्चित केलेले एकही काम सुटता कामा नये. कामाचा दर्जा आणि निविदेनुसार निश्चित काम न केल्यास दंडात्मक नाही, तर फसवणूक केली म्हणून फौजदारी कारवाई होऊ शकते’, अशीही तंबी दिली.

संपादकीय भूमिका

  • आयुक्तांनी केवळ चेतावणी न देता कामचुकार ठेकेदारांवर फौजदारी कारवाईही करावी !
  • गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची अशी बैठक घेऊन आयुक्तांना असे सांगावे लागते, हे लज्जास्पद आहे. खरेतर चांगल्या दर्जांचे रस्ते न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या सूचीत टाकून त्यांना कायमस्वरूपी ठेका न देण्याचे धोरण महापालिकेने राबवले पाहिजे.