परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ऑनलाईन भावसोहळ्याच्या वेळी सौ. रंजना गौतम गडेकर यांना आलेल्या अनुभूती

१. परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूची वस्त्रे आणि अलंकार धारण करत असतांनाच वातावरणात श्रीविष्णुतत्त्व प्रक्षेपित होणे आणि त्यामुळे साधिकेचे मन निर्विचार होऊन तिचे ध्यान लागणे

सौ. रंजना गडेकर

‘१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित भावसोहळ्याला जाण्याची सिद्धता करत होते. त्या वेळी मी आश्रमात सेवा करत होते. परात्पर गुरु डॉक्टर देवतांची वेशभूषा आणि अलंकार धारण करत असतांना ‘माझे मन निर्विचार होऊन माझे ध्यान लागत आहे’, असे मला जाणवले. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णूची वस्त्रे आणि अलंकार धारण करतांनाच वातावरणात श्रीविष्णुतत्त्व प्रक्षेपित होत आहे आणि त्यामुळेच मला ही अनुभूती येत आहे’, असे मला वाटले.

२. वाईट शक्तीचे अस्तित्व नष्ट होऊन ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेता येणे

मला माझ्या सहस्रारावर चैतन्य आणि थंडावा जाणवला. ‘माझ्या सहस्रारातून शीतल लहरी माझ्या शरिरात जात असून त्यांचा ओघ प्रचंड प्रमाणात आहे. मला त्रास देणाऱ्या मोठ्या वाईट शक्तीचे अस्तित्व न्यून होऊन मला ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेता येत आहे’, असेही मला सूक्ष्मातून जाणवले.

३. आश्रमाच्या परिसरातील झाडांच्या हलण्यातून ‘निसर्गही परात्पर गुरु डॉक्टरांच्या सोहळ्याला प्रतिसाद देत आहे’, असे जाणवणे

एरव्ही या दिवसांत (उन्हाळ्यात) संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरातील झाडांचे पानही हलत नाही. कार्यक्रम चालू झाल्यावर आश्रमाच्या आजूबाजूची झाडेही हलत होती. काही झाडे तर वाऱ्यामुळे इतकी हलत होती की, ‘ती डोलत आहेत’, असे मला वाटत होते. ‘त्या वेळी निसर्गही परात्पर गुरु डॉक्टरांच्या सोहळ्याला प्रतिसाद देत आहे’, असे मला वाटले.

४. कार्यक्रम चालू झाल्यावर वायुतत्त्व कार्यरत होऊन वातावरणात गारवा जाणवणे आणि गरुड पक्षाने आश्रमाला प्रदक्षिणा घालणे

नेहमी या दिवसात वातावरण उष्ण असते; परंतु कार्यक्रम चालू असतांना मला वातावरणात गारवा जाणवला. त्या वेळी ‘नेहमीपेक्षा वायुतत्त्व वातावरणात अधिक प्रमाणात कार्यरत आहे’, असे मला वाटले, तसेच कार्यक्रम चालू असतांना एक गरुड पक्षी आश्रमावरून एक गोल घिरटी घालून गेला. ‘त्या वेळी त्याने आश्रमाला प्रदक्षिणाच घातली’, असे मला वाटले.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून वातावरणात श्रीविष्णुतत्त्व प्रक्षेपित झाल्याने साधिकेसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन वाईट शक्तींची शक्ती न्यून होणे

प्रत्यक्षात मी तो कार्यक्रम पाहिला नाही, तरीही माझ्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन मला त्रास देणाऱ्या वाईट शक्तींचे अस्तित्व न्यून झाल्याचे मला जाणवले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांकडून वातावरणात श्रीविष्णुतत्त्व प्रक्षेपित झाल्याने वातावरणातील सर्व वाईट शक्तींची शक्ती न्यून झाली आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवले.

६. भाव सोहळ्याच्या वेळी पणती लावण्याची सेवा करतांना साधिकेचा आध्यात्मिक त्रास उणावणे

त्या दिवशी मी साधिकांसमवेत पणत्या लावण्याची सेवा केली. ही सेवा करत असतांना मला पुष्कळ चैतन्य मिळून हलके वाटले. माझा आध्यात्मिक त्रास उणावला.

महर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना श्रीविष्णु, श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार  घालून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले होते. त्यामुळे समष्टीला स्थुलातून भावाच्या स्तरावर लाभ झाला, तसेच सूक्ष्मातूनही आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. प्रत्यक्ष श्रीमहाविष्णूचेच पृथ्वीवर प्रकटीकरण झाले. त्यामुळे संपूर्ण वातावरणातच पालट झाला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच वातावरणात श्रीविष्णुतत्त्वाचे प्रक्षेपण अधिक प्रमाणात होत होते.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक