योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी सांगितलेली अनुष्ठाने करण्याचे नियोजन आणि समन्वय करण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी १२ ते २७.७.२०१४ या कालावधीत एकूण १० दिवस गायत्री अनुष्ठान आणि ६ ते १२.९.२०१४ हे सात दिवस अनुष्ठान करायला सांगितले होते. या अनुष्ठानाच्या नियोजनाची सेवा शिकण्याची संधी श्रीकृष्णकृपेने मला मिळाली होती. ‘प.पू. गुरुदेव सतत आपल्यासाठी पुष्कळ करत असतात. आता आपल्याला आपल्या गुरूंसाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे (जी त्यांनीच दिली आहे आणि तेच करवून घेत आहेत.)’, या विचाराने अनुष्ठानात सहभागी असलेल्या सर्व साधकांमध्ये पुष्कळ कृतज्ञताभाव आणि उत्साह जाणवत होता. ‘अनुष्ठान चांगले व्हावे’, याबद्दल सर्वच साधकांनी केलेल्या प्रयत्नांमधून मला पुष्कळ शिकायला मिळाले. या सेवेच्या कालावधीत मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

१. साधकांची तळमळ

अ. अनुष्ठानामध्ये सहभागी असलेल्या साधकांपैकी कुणालाच पहाटे लवकर उठण्याची सवय नव्हती; पण या कालावधीत साधक पहाटे ४.३० वाजता उठून अनुष्ठानाला वेळेवर उपस्थित रहात होते.

आ. एक साधक पहाटे ३.३० वाजता उठून घरातील कामे पूर्ण करून मुसळधार पावसात दुचाकी चालवून आश्रमातील अनुष्ठानाला वेळेवर उपस्थित रहायचे.

इ. काही साधक पहाटे ३.३० ते ६.३० एक सेवा करून पुन्हा ७.१५ वाजता अनुष्ठानासाठी उपस्थित राहिले.

२. त्रासांवर मात करणे

२ आ १. साधकांना जप करतांना अनिवार ग्लानी येऊनही अनेक उपाय करून जप पूर्ण करणे : वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे आणि लवकर उठण्याची सवय नसल्याने साधकांना जप करतांना अनिवार ग्लानी येत असे; पण साधक तोंडावर पाणी मारणे, कापूर आणि अत्तर यांचे उपाय करणे, उभे राहून जप करणे इत्यादी उपाय करून जप करायचे.

श्री. अमर जोशी

३. संतांचा सहभाग

अ. पू. अशोक पात्रीकर काका अनुष्ठान करायला यायचे. त्यांना अनुष्ठानाच्या कालावधीत झोप येत असल्यास ते कापूरमिश्रित पाण्याचा फवारा (स्प्रे) तोंडावर मारणे, उभे रहाणे, मोठ्याने जप म्हणणे आदी उपाय करायचे.

आ. एकदा अनुष्ठानासाठी साधकसंख्या अल्प पडत असल्याने ‘काही साधकांना अनुष्ठानासाठी घेऊ शकतो का ?’, असे विचारण्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुम्हाला साधक अल्प पडत आहेत का ? मी उद्या अनुष्ठानाला येतो. मी पावणेसहा वाजता येतो.’’ साधकसंख्या पुरेशी झाल्यावर त्यांनी अनुष्ठानाला न येण्याचे ठरवले.

४. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी साधकांना ‘त्याग आणि तळमळ यांसह व्यष्टी साधनेचे गांभीर्य आवश्यक आहे’, याची जाणीव करून देणे

अनुष्ठानाच्या कालावधीत साधकांना अनुष्ठानानंतर थकवा येणे, घशाला जंतूसंसर्ग होणे, सूज येणे, उष्णतेचे त्रास होणे, असे त्रास होऊ लागले. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना उपाययोजना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘साधकांना त्रास होत आहे, तर अनुष्ठान करू नका. मीच करतो.’’ साधकांवरील अपार प्रीतीमुळे त्यांनी स्वतःच अनुष्ठानाचे दायित्व घेतले. ‘साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्यांना त्रास होत आहे’, असा निरोप देऊन त्यांनी ‘त्याग आणि तळमळ यांसह साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य आवश्यक आहे’, याची जाणीव करून दिली.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना त्रास लिहून देण्यास सांगणे आणि ज्या साधकांना अधिक त्रास होतो, त्यांच्याऐवजी पर्यायी साधकांचे नियोजन करण्यास सांगणे

गायत्री अनुष्ठानाच्या कालावधीत साधकांना त्रास झाल्याचे योगतज्ञ दादाजी यांना कळवल्यावर त्यांनी अनुष्ठान थांबवायला सांगितले होते. हे लक्षात ठेवून ‘त्रास झाला, तरी सहन करू. प.पू. गुरुदेव प्रतिदिनच त्रास सहन करतात. आम्ही १२ दिवस सहन करू शकत नाही का ? या वेळी मात्र अनुष्ठान थांबवावे लागू नये’, असा विचार करून साधक ‘महामृत्युंजय अनुष्ठान करतांना त्रास होत असल्यास सांगत नाहीत’, असे लक्षात आले. या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले ‘‘आपल्याला संशोधन करायचे आहे की, अशा प्रकारे अनुष्ठाने करून मृत्यूयोग टाळतांना कसे अडथळे येतात, तसेच ‘एकाचा मृत्यूयोग टाळण्यासाठी तो दुसऱ्यावर यावा’, हे आपल्याला अपेक्षित नाही. त्यामुळे साधकांना त्रास होत असल्यास त्यांनी लिहून द्यावेत आणि ज्या साधकांना अधिक त्रास होतो, त्या साधकांच्या ऐवजी पर्यायी साधकांचे नियोजन करूया.’’

६. महामृत्युंजय अनुष्ठानासाठी अन्य आश्रम आणि सेवाकेंद्रे यांतील साधकांचा सहभाग असल्याने अधिकाधिक व्यापक होण्याची संधी मिळणे

काही मासांपूर्वीपर्यंत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेली अनुष्ठाने केवळ वेदपाठशाळेतील विद्यार्थीच करायचे. त्यानंतर अनुष्ठाने अधिक प्रमाणात होत असल्याने मी रामनाथी आश्रमातील अन्य साधकांचे साहाय्य घेऊ लागलो. गायत्री अनुष्ठानासाठी रामनाथी आश्रमातील साधकांसह देवद आणि मिरज या आश्रमांतील साधकांचा सहभाग होता. त्यानंतर झालेल्या महामृत्युंजय अनुष्ठानात रामनाथी, देवद, मिरज या आश्रमांतील आणि वाराणसी सेवाकेंद्रातील साधकांचा सहभाग होता. त्यामुळे मला अधिकाधिक व्यापक होण्याची संधी मिळाली.

अनुष्ठानाचे नियोजन आणि समन्वय करण्याची सेवा करतांना माझ्यात व्यापकत्व अन् सतर्कता वाढली. इतकी अफाट व्याप्ती असलेली सेवा मी एकटा करू शकत नसल्याने सेवेत संघभाव दिसल्यावर आणि अडचणी आल्यावर माझा शरणागतभाव वाढला. त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अमर जोशी, सनातन-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.९.२०१४)