भोकरदान (जिल्हा जालना) येथे छत्रपती शिवरायांची मूर्ती असणाऱ्या प्रवेशद्वाराला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यावरून दोन गटांत दगडफेक !

  • वाहनांना आग लावली ! 

  • ५ पोलिसांसह काही जण घायाळ !

जालना – जिल्ह्यातील भोकरदान गावात १२ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती गावात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आली. त्या प्रवेशद्वाराचे नामकरण ‘गोपीनाथ मुंडे’ असे करण्यात येणार होते; मात्र या कारणावरून २ गटांत वाद होऊन एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ५ पोलीस कर्मचाऱ्यांसह काही जण घायाळ झाले. पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे.

या दगडफेकीत अनेक वाहनांची हानी झाली आहे. काही ठिकाणी आगीही लावण्यात आल्या. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे, अशी माहिती येथील पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी १३ मे या दिवशी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी हवेत गोळीबार करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. येथे कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी अमरावती येथे झेंडा हटवण्याच्या कारणावरून हिंदु-मुसलमान यांच्यात दंगल झाली होती.