धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) – येथील विधानसभा भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी खलिस्तानी झेंडे लावल्याचे, तसेच भवनाच्या भिंतींच्या बाहेरील बाजूस खलिस्तानी समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्याचे आढळून आले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी झेंडे काढून घोषणा पुसून टाकल्या. या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर विधानसभा भवन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या आधारे अन्वेषण चालू केले आहे. पंजाबमधून आलेल्या काही पर्यटकांचे हे कृत्य असू शकते, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हिमाचल प्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर ट्वीट करून म्हटले, ‘या विधानसभेत केवळ हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात नसते. याचाच अपलाभ काही समाजविघातक घटकांनी घेतला आहे. असे कृत्य आम्ही सहन करणार नाही. या घटनेची तातडीने चौकशी केली जाईल. तसेच दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हे कृत्य करणार्यांना मी सांगू इच्छित आहे की, धाडस असेल, तर त्यांनी समोर येऊन दाखवावे.’
संपादकीय भूमिका
|