भारताचा जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनासंबंधी मूल्यांकनाविषयी तीव्र आक्षेप !

भारताने जाहीर केलेली कोरोनाबळींची संख्या पद्धतशीर अभ्यासातूनच समोर !

नवी देहली – जागतिक आरोग्य संघटनेकडून (‘डब्ल्यू.एच्.ओ’कडून) कोरोनाला बळी पडलेल्यांच्या भारतातील संख्येविषयी प्रश्‍न उपस्थित करून ती संख्या ४७ लाखांहून अधिक असल्याचे सांगितल्यावर भारताने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा आकडा भारताने घोषित केलेल्या कोरोनाबळींच्या संख्येपेक्षा तब्बल १० पटींहून अधिक आहे. यावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, देशाकडे पद्धतशीर रूपाने गोळा केलेली माहिती (डेटा) उपलब्ध आहे. आमच्याकडे १३० कोटी लोकांपैकी कोरोना लस मिळालेल्यांपैकी ९७-९८ टक्के जणांची माहिती उपलब्ध आहे. आतापर्यंत १९० कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. ही सर्व माहिती अत्यंत बारकाईने एकत्र करण्यात आली. त्यामुळे आम्हाला सांख्यिकी अथवा वृत्तसंस्थांच्या अहवालांवर अवलंबून रहाण्याची आवश्यकता नाही.

सौजन्य विओन 

‘डब्ल्यू.एच्.ओ’ला १० पत्रे लिहिली, तरी त्यांनी माहिती दिली नाही ! – केंद्रशासन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार ‘आम्ही अधिकृत व्यासपिठाद्वारे जागतिक आरोग्य संघटनेकडे विरोध नोंदवू. संघटनेने गोळा केलेला ‘डेटा’ १७ राज्यांवर आधारित आहे. या राज्यांची निवड कोणत्या आधारे केली, डेटा केव्हा घेतला, याची माहिती संघटनेने आम्हाला दिली नाही. आम्ही यासंदर्भात १० पत्रे लिहिली, पण ‘डब्ल्यू.एच्.ओ’ने उत्तर दिले नाही.

भारताकडे जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदणीची प्रभावी यंत्रणा ! – एम्स्

एम्स देहलीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, ‘भारतात जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदणीची प्रभावी यंत्रणा आहे. त्यानुसार एवढे मृत्यू झाल्याचे समोर आले नाही.’ सरकारी आकड्यांनुसार भारतात कोरोनामुळे ५.२४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. भार्गव म्हणाले…

१. जेव्हा कोरोनाला लोक बळी पडत होते, तेव्हा त्या मृत्यू झालेल्यांच्या संदर्भातील तांत्रिक व्याख्या ही स्वत: जागतिक आरोग्य संघटनेकडेही नव्हती.

२. जर आज एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले आणि ती दोन आठवड्यांनी मृत झाली, तर त्यास कोरोनाचा बळी म्हणायचे का ? अथवा एखाद्या व्यक्तीचा २ अथवा ६ मासांनी मृत्यू झाला, तरी त्यास कोरोनाचा बळी म्हणावे का ?

३. त्यामुळे आमच्याकडे एकत्र झालेल्या माहितीचा अभ्यास केल्यावर आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की, कोरोना संक्रमित व्यक्तींतील ९५ टक्के मृत्यू हे पहिल्या ४ आठवड्यांत झाले. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची मर्यादा ही ३० दिवस ठेवण्यात आली.