‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे आळंदी (पुणे) येथे लोकार्पण !

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविददेव गिरि महाराज यांच्या हस्ते लोकार्पण !

डावीकडून आचार्य सत्यनारायण दास, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण करतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि श्री. मुकुलजी कानिटकर

आळंदी (जिल्हा पुणे), ३ मे (वार्ता.) – गेल्या २४ वर्षांपासून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अव्याहतपणे प्रयत्नरत असलेल्या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे उद्घाटन आणि लोकार्पण ३ मे म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या आळंदी येथील वेदपाठशाळेत भावपूर्ण वातावरणात झाला. ‘डिजिटल न्यूजपेपर’मुळे चिरंतन दृष्टीकोन आणि राष्ट्र धर्म उत्थानासाठी कार्यरत असणारे ‘सनातन प्रभात’ आता अधिक व्यापक स्वरूपात जगभरातील वाचकांना उपलब्ध होणार आहे.

या वेळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे उपसंपादक, तसेच महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे यांनी या ‘डिजिटल न्यूजपेपर’चा उद्देश सांगितला. उपस्थित मान्यवरांची ओळख हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी करून दिली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे हेही उपस्थित होते.


प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

देशात घडत असलेल्या परिवर्तनात ‘सनातन प्रभात’चा पुष्कळ मोठा वाटा आहे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

‘सनातन प्रभात’चे कार्य मला अनेक वर्षांपासून परिचित आहे. या संस्थेने अतिशय उत्तम कार्य चालवले आहे. या कार्यामुळे राष्ट्रामध्ये सगळीकडे एका जागरणाची अनुभूती कुणालाही येऊ शकते, अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिदिन आपल्या घरी येणाऱ्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘ई पेपर’ आवृत्ती प्रथमच प्रकाशित होत आहे. त्याचे विमोचन आळंदी क्षेत्रातून वेदश्री तपोवनातून भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने झाल्याची मी घोषणा करत आहे.

माझ्या दृष्टीने हिंदु राष्ट्र हे तर मुळात आहेच. हिंदु साम्राज्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्या दिशेने आपली अधिक वेगाने वाटचाल होत आहे, हे संपूर्ण देशाचे वातावरण बघता लक्षात येत आहे. देशात जे काही परिवर्तन घडत आहे, जी काही प्रगती योग्य दिशेने चालू आहे, त्यामध्ये सनातन प्रभातचा पुष्कळ मोठा वाटा आहे, हे मान्य करण्यात मला काही संकोच वाटत नाही. ‘सनातन प्रभातला सर्व प्रकारच्या शुभकामना देत आपल्याकडून अशाच प्रकारचे कार्य घडो, या भारतमातेची सेवा आणि भारतीय संस्कृतीची सेवा होत राहो अन् आपल्या पूर्वजांनी पाहिलेली आणि आपणही आपल्या उराशी बाळगलेली स्वप्ने आपल्या डोळ्यांसमोर साकार होण्याचे सद्भाग्य आपणा सर्वांना मिळो’, अशा प्रकारची याचना मी भगवान ज्ञानेश्वर माऊलींना करतो.


संस्कृतीला धरून चालू असलेले कार्य काळानुसार समाजात पोचवण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे ! – आचार्य सत्यनारायण दास, श्रीराम कुंज कथा मंडप, अयोध्या

आचार्य चाणक्य यांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास कोणत्याही राष्ट्राचे रक्षण करायचे असल्यास त्या राष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षण केल्यास राष्ट्र सुरक्षित रहाते; पण त्या राष्ट्राची संस्कृती नाश पावल्यास ते राष्ट्र मृतप्राय होते. ‘भारतीय संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या या संस्थेचे हे कार्य उत्तरोत्तर प्रगती करो’, अशी प्रार्थना आहे. ‘संस्कृतीला धरून जे कार्य चालू आहे ते आजच्या काळानुसार समाजात पोचवण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे’, असे गौरवोद्गारही काढले.


संस्कृतीचा प्रसार करण्याचा वसा ‘सनातन प्रभात’ने सांभाळला ! – श्री. मुकुल कानिटकर, अखिल भारतीय संघटन मंत्री, भारतीय शिक्षण मंडळ

टीव्हीमुळे संस्कृतीचा नाश होईल, असे लोकांना वाटले; पण त्यामुळेच रामायण-महाभारत घराघरांत पोचले. ही भारतीय आणि सनातन धर्माची विशेषता आहे. माध्यम कुठलेही असो त्याला पराजित करण्याकरता माध्यमाची शक्ती घेऊन आपल्या संस्कृतीचा प्रसार करणे, हा आपला वसा ‘सनातन प्रभात’ने सांभाळला आणि ‘ई-पेपर’ काढला. त्या करता त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा !


आघात, हिंदूंच्या समस्यांना वाचा फोडणारे ‘सनातन प्रभात’ हे अनेक हिंदुत्वनिष्ठांना आधारस्तंभ वाटते ! – श्री. अरविंद पानसरे, उपसंपादक, सनातन प्रभात

श्री. अरविंद पानसरे म्हणाले, ‘‘धर्मावरील आघात, हिंदूंच्या समस्यांना वाचा फोडणारे ‘सनातन प्रभात’ हे अनेक हिंदुत्वनिष्ठांना आधारस्तंभ वाटते. कोरोनाच्या काळात अनेक वृत्तपत्रे बंद होती. या काळात ‘सनातन प्रभात’ ‘पी.डी.एफ.’च्या माध्यमातून आपल्या हिंदु बांधवांपर्यंत पोचले. आता डिजिटल युग आहे. हे लक्षात घेऊन ‘सनातन प्रभात’ची ‘ऑनलाईन’ आवृत्तीही उपलब्ध आहे. ‘डेली हंट’ या ‘न्यूज अ‍ॅप’वरही आपण ‘सनातन प्रभात’ पाहू शकतो. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’ ‘ई-पेपर’च्या स्वरूपातही उपलब्ध होत आहे. हिंदूंवर होणारे वाढते आघात पहाता हिंदूंना अव्याहतपणे दिशादर्शनाची आवश्यकता आहे. अशा स्थितीत अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचण्यासाठी या माध्यमाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.’’

‘सनातन प्रभात’चा ई – पेपर वाचण्यासाठी क्लिक करा – epaper.sanatanprabhat.org