‘गोवा इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ) म्हणजे पोर्तुगिजांनी गोव्यातील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची परिसीमा !

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्ष १५१० मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी आफोन्सो द अल्बुकर्क याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांनी ‘सिटी ऑफ गोवा’ (तिसवाडी प्रांत) जिंकला. हळूहळू त्यांनी त्यावरील पकड घट्ट केली. त्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांनी राजसत्तेचा वापर करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू केला. स्थानिक हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यास भाग पाडले. त्या वेळी पोर्तुगिजांकडे तिसवाडी हा एकच प्रांत होता. वर्ष १५४० मध्ये धर्मांतर (बाटवणे) मोठ्या प्रमाणात चालू झाले. वर्ष १५६६ पर्यंत तिसवाडी (गोवा बेट) प्रांतातील हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर घडवून आणले. हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली.

स्थानिकांनी पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या भीतीपोटी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला. स्थानिक हिंदूंनी जरी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तरी त्यातील बरेच जण ख्रिस्ती धर्मानुसार आचरण करत नव्हते. ते पूर्वीच्याच हिंदु परंपरा, रितीरिवाज यांप्रमाणे आचरण करायचे. ख्रिस्ती धर्मानुसार आचरण न करणार्‍यांना गुन्हेगार ठरवून कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने गोव्यात इन्क्विझिशनची स्थापना झाली.

श्री. उमेश नाईक

१. फ्रान्सिस झेवियर याने केली होती ‘गोवा इन्क्विझिशन’ची मागणी

फ्रान्सिस झेवियर या ख्रिस्ती धर्मगुरूने पोर्तुगालच्या राजांना पत्र लिहून गोव्यात इन्क्विझिशनची (धर्मसमीक्षण सभेची) स्थापना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १५६० या वर्षी गोव्यात इन्क्विझिशन लागू करण्यात आले. गोव्यात इन्क्विझिशनची जुलमी न्यायप्रणाली चालू झाली. ख्रिस्ती पंथाचे पालन न करणे, तसेच ख्रिस्ती पंथाच्या प्रसारामध्ये अडचणी निर्माण करणे इत्यादी आरोपांखाली स्थानिकांना पकडून कारागृहात डांबले गेले. तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार चालू झाले. त्यांना गुन्ह्यांची स्वीकृती करण्यास बलपूर्वक भाग पाडले जाऊ लागले. नंतर त्यांना दोषी ठरवून विविध प्रकारच्या कठोर शिक्षा ठोठावण्यात येऊ लागल्या. काहींचे हात-पाय कापण्यात आले, काहींचे कान आणि जिभा छाटल्या गेल्या. काहींना मोठ्या चाकावर फिरवून त्यांच्या हाडांचा चुराडा करण्यात आला, तर काहींना जाळून ठार मारण्यात आले.

२. इन्क्विझिशनचे अधिकारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यांकडून हिंदूंचा छळ !

गोव्यात इन्क्विझिशन लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले. ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजोरी करू लागले. गोव्यातील पोर्तुगीज प्रांतांमध्ये मूर्तीपूजेवर बंदी घालण्यात आली. हिंदु धर्माचे खासगीत पालन करत असल्याचा आरोप करून असंख्य नवख्रिस्तींचा (बळजोरीने धर्मांतर करण्यात आलेले हिंदू) छळ करण्यात आला. त्यांना कह्यात घेऊन इन्क्विझिशनच्या कारागृहात डांबले गेले. तेथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून गुन्ह्याची स्वीकृती करण्यासाठी दबाव आणला गेला आणि त्यांना ख्रिस्तेतर धर्माचे पालन केल्याविषयी दोषी ठरवले गेले. दोषी ठरवलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारणे, हातकातरो खांब्यावर चढवून हात कापणे, वधस्तंभावर जाळणे आणि रक्तपिपासू मिशनर्‍यांकडून नखे आणि डोळे चिरडणे यांसारख्या भयंकर शिक्षा देण्यात आल्या. अनेक स्त्रिया आणि मुले यांना गुलाम बनवून संपूर्ण गावे जाळण्यात आली.

त्यांच्या छळासाठी मोठी चाके वापरली जायची. हिंदु धर्माचे पालन केल्याविषयी दोषी ठरवून त्यांना चाकाला बांधले जायचे आणि ते चाक फिरवले जायचे. त्यामुळे निष्पापांच्या हाडांचा चुराडा केला जायचा. कधी कधी हिंदु पालकांच्या कह्यातून त्यांच्या मुलांना हे अधिकारी घेऊन जायचे आणि तरीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला नाही, तर त्यांच्या समक्ष त्यांच्या मुलांना जाळून मारायचे. सहस्रावधी निष्पाप हिंदूंना धर्मांतरानंतर ख्रिस्ती पंथाचे पालन न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून हात कापण्यापासून ते जाळून मारण्यापर्यंतच्या कठोर शिक्षा ठोठावण्यात आल्या.

३. गोवा इन्क्विझिशनचा क्रूर इतिहास जगापासून लपवणारे पोर्तुगीज राज्यकर्ते

इन्क्विझिशनचे संपूर्ण कार्य गुप्त पद्धतीने चालायचे. इन्क्विझिशनच्या कैद्यांचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध पूर्णपणे तुटायचा. बाहेरच्या जगाला, कुटुंबियांना कैद्यांविषयी माहिती मिळण्याचा कुठलाच मार्ग नव्हता. एका कैद्याला दुसर्‍या कैद्याचे दर्शनही घडत नव्हते. एका खोलीत एकाच कैद्याला ठेवले जायचे. त्यामुळे एका कैद्याचा छळ दुसर्‍या कैद्याला कळत नव्हता. इन्क्विझिशनचा क्रूर इतिहास जगासमोर येऊ नये, यासाठी त्याकाळच्या पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी इन्क्विझिशनशी सर्व कागदपत्रे जाळून टाकली असावी, असे काही इतिहासकारांचे मत आहे.

४. मंदिरे तोडून त्या ठिकाणी चर्चची उभारणी

वर्ष १५६६ आणि १५६७ या कालावधीत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ख्रिस्ती पंथाच्या प्रसाराची मोहीम बार्देश अन् सासष्टी प्रांतांकडे वळवली. सासष्टीतील स्थानिक हिंदूंना या विषयीची चाहूल लागताच काहींनी त्यांच्या देवतांसह अंत्रुज महाल (फोंडा प्रांत) येथे पलायन केले, तर काहींनी कर्नाटक गाठले. यामध्ये कुठ्ठाळी येथील श्री मंगेश, केळशी येथील श्री शांतादुर्गा, वेर्णा येथील श्री महालसा, राय येथील श्री कामाक्षी, लोटली येथील श्री रामनाथ आणि इतर अनेक देवतांचा समावेश होता. या कालावधीत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी सासष्टी प्रांतातील सुमारे ३०० हिंदूंची मंदिरे नष्ट केली. या उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या जागेवर चर्च उभारण्यात आली. मंदिरांची भूमी चर्चकडे सुपुर्द करण्यात आली. जे कुणी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सिद्ध होत नव्हते त्यांच्या भूमी आणि घरे बलपूर्वक कह्यात घेतली गेली आणि त्यांना गाव सोडून जाण्यास भाग पाडले. बार्देश प्रांतामध्येही ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर घडवून आणले. तसेच तेथील ३०० हून अधिक हिंदूंची मंदिरे तोडून त्या ठिकाणी चर्च उभारण्यात आले.

५. इन्क्विझिशनमुळे धर्माची आणि संस्कृतीची हानी

पोर्तुगिजांनी केवळ वसाहतवादावर समाधान मानले नाही. त्यांनी धर्मांतर आणि इन्क्विझिशन यांच्या माध्यमातून गोव्यातील स्थानिक लोकांचा धर्म आणि त्यांची संस्कृती नामशेष केली. गोव्यात कोकणी, मराठी, संस्कृत आणि अरबी भाषांतील पुस्तकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. कोकणी भाषेच्या वापरावर बंदी घालण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर भारतात स्थापन झालेल्या धर्मनिरपेक्ष राजवटींनी पोर्तुगिजांचा हा काळाकुट्ट इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला. इतिहास कितीही झाकण्याचा प्रयत्न झाला, तरी कालांतराने तो उजेडात येतोच. इतिहासातील चांगल्या-वाईट घटनांमधून बोध घेऊन, तसेच ऐतिहासिक महापुरुषांच्या शौर्यगाथांचा अभ्यास करून त्याप्रमाणे वर्तमान घडवत भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे.

लेखक : श्री. उमेश नाईक, मडकई, गोवा.