१. मृत्तिका पूजन
सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञताभाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
अ. मातीत आळी करणे आणि पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय्य तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा आणि या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतभूमीचे अक्षय्य तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतभूमीची साफसफाई करून खतमिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या भूमीतील मृत्तिकेचे कृतज्ञभाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृत्तिकेमध्ये आळी करावीत आणि त्या आळ्यांमध्ये बियाणे पेरावे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास प्रारंभ केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते आणि कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य. आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वतःला आणि इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
(पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण अधिक असल्याकारणाने एकदा पावसाला प्रारंभ झाला की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक भूमीतीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच पावसाळा प्रारंभ होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच न्यून असल्याने आणि शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने भूमी नापीक होत चालल्या आहेत आणि कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही न्यून झाले आहे.)
२. वृक्षारोपण
या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. – ब्रह्मतत्त्व (८.५.२००५)