काशीला पोचल्यावर मला विलक्षण शांतीचा अनुभव आला ! – आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ड्वाइट हॉवर्ड

हॉवर्ड यांचे आध्यात्मिक यात्रेसाठी भारतात आगमन

वाराणसी – अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ड्वाइट हॉवर्ड शांतीच्या शोधात भारतात काशी यात्रेला आले आहेत. ‘काशीला पोचल्यावर मला विलक्षण शांतीचा अनुभव आला’, असे हॉवर्ड यांनी सांगितले. काशीमध्ये त्यांनी जीवनदायिनी गंगामातेच्या काठावर जगभरात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना केली. येथे आल्यावर त्यांना ‘गंगेच्या काठावर वसलेल्या श्री बाबा विश्‍वनाथांच्या काशीला मोक्षनगरी का म्हणतात ?’, हे समजले. यासह त्यांना ‘काशी येथे अंत्यसंस्कार का केले जातात ?, काशीला अनादी काळापासून अविनाशी का म्हटले जाते ?’, हेही समजले.
ड्वाइट हॉवर्ड यांनी येथील जीवन आणि अध्यात्म यांचे तत्त्वज्ञान जाणून घेतल्यानंतर ते भारावून गेले. ते दशाश्‍वमेध घाटावर होणार्‍या जगप्रसिद्ध गंगा आरतीला उपस्थित होते. या प्रसिद्ध खेळाडूने काशीचा अद्भूत कायापालट केल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. काशी हा पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ आहे. ‘हा एक आध्यात्मिक प्रवास आहे, जो तुमच्या आत्म्याला स्पर्श करतो’, असे विधान हॉवर्ड यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे.