पुण्यातील ‘ताबूत इनाम एन्डॉमेंट ट्रस्ट’ची ८ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त !

पुणे – जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या इम्तियाज महंमद प्रकरणामध्ये ‘ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्ट’च्या (टी.आय.ई.टी.) बँक खात्यात जमा झालेली दीड कोटी रुपयांची रक्कम आणि ७ कोटी १७ लाख रुपयांची निवासी अपार्टमेंट अशी ८ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) २६ एप्रिल या दिवशी जप्त केली. यामध्ये मुख्य आरोपी इम्तियाज महंमद, हुसेन शेख, चांद रमजान मुलाणी, सतीश राजगुरु, संतोष कांबळे आणि इतर यांनी संगनमत करून फसवणूक केली होती. इशराक खान, झरीफ खान यांनी ‘टी.आय.ई.टी.ट्रस्ट’ची बनावट कागदपत्रे सिद्ध करून आम्ही विश्‍वस्त असल्याचे दाखवून पदाधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून ट्रस्टच्या नावे अधिकोषामध्ये खाते उघडले होते. पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यावरून या प्रकरणाचे अन्वेषण ‘ईडी’कडे गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.