घरोघरी आयुर्वेद : उन्हाळ्यात कोणती काळजी घ्याल ?

उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे सर्वत्र अनुभवायला येत आहे. पारा जरी चढतांना दिसला, तरी याला सरसकट उन्हाळा म्हणत तशीच थेट काळजी घेणे अयोग्य ठरेल. याला कारण सध्या चालू असलेला चैत्र मास हा वसंत ऋतूत येतो. या काळात शरिरातील कफ अत्याधिक वाढत असल्याने ग्रीष्म ऋतूत करण्याचे सगळे थंड उपाय केल्यास लाभ होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. सर्दी, ताप असेही त्रास होऊ शकतात. याकरता हा भेद लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यातही भौगोलिक रचना लक्षात घेता मुंबई, कोकण येथे वसंत ऋतुचर्येवर, तर विदर्भ आणि मराठवाडा येथे ग्रीष्म ऋतुचर्येवर अधिक भर देणे आवश्यक आहे. तूर्त वसंत ऋतूच्या उन्हाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी ? याविषयीची माहिती येथे देत आहे.

वैद्य परीक्षित शेवडे

१. घराबाहेर पडतांना छत्री, टोपी यांचा वापर अवश्य करावा. स्वतःजवळ छोटीशी का होईना, पाण्याची बाटली ठेवावी.

२. पुढील किमान एक मास तरी आहारात कडू, तिखट आणि तुरट चवीचा प्राधान्याने वापर करावा.

३. वैद्यांच्या सल्ल्याने ‘वमन’ हे पंचकर्मातील एक कर्म करून घ्यावे.

४. चंदन, भीमसेनी कापूर यांचा उपयोग अंगाला लेप लावण्यासाठी केल्याने उष्णता आटोक्यात रहाते; मात्र कफही वाढत नाही.

५. आहारात वर्षभर जुने गहू, जव, पांढरा कांदा, आंबा यांचा उपयोग करावा.

६. आपल्या कामाच्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा (एसी) असल्यास उन्हातून थेट तेथे प्रवेश न करता काही काळ व्हरांड्यामध्ये थांबून शरिराला तापमान पालटासाठी सिद्ध करावे. अन्यथा शीतपित्तासारखा त्रास होतो.

७. उन्हातून आल्यावर लगेच फळांचे रस, सरबत, थंड पाणी यांचे सेवन टाळावे.

८. पिण्याच्या पाण्यात वाळ्याची जुडी घातल्याने शरिराला आवश्यक थंडावा मिळतो, पचन उत्तम रहाते आणि कफ अवाजवी वाढत नाही. यामुळे लहान मुलांना उन्हाळी लागण्याचा त्रास होत नाही.

९. मध आणि पाणी यांचाही पिण्यास उपयोग करता येऊ शकतो.

१०. सुटीच्या दिवशी कुटुंब, मित्र परिवारासह वृक्षांची सावली असलेल्या ठिकाणी फिरायला जाणे, हाही एक उत्तम आरोग्यवर्धक उपाय आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली