राज ठाकरेंच्या संभाजीनगरमधील सभेला अनुमती मिळणारच ! – बापू वागस्कर, राज्य सरचिटणीस, मनसे

अक्षय्य तृतीयेला मनसेकडून सर्व मंदिराममध्ये आरती करणार

पुणे – संभाजीनगर येथे १ मे या दिवशी होणार्‍या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्य सरकार अनुमती देईलच आणि नाही दिली तरी आपण न्यायालयातून अनुमती आणू. या सभेसाठी पुण्यातून राज ठाकरे यांचा ताफा संभाजीनगर येथे जाणार असून त्यांच्यासह जवळपास १०० ते १५० गाड्यांचा ताफा असणार आहे, तसेच अयोध्या दौर्‍यासाठीही फक्त मनसैनिकच येणार नसून सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आम्ही येण्याचे आवाहन करणार आहे, असे मनसेचे राज्य सरचिटणीस बापू वागस्कर यांनी सांगितले. या दौर्‍यासंदर्भात २६ एप्रिल या दिवशी पुण्यात माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली.

वागस्कर पुढे म्हणाले की, अक्षय्य तृतीयेला राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेकडून सर्व मंदिराममध्ये आरती करण्यात येणार आहे. अशा सूचना सर्व शाखा अध्यक्षांना दिल्या आहेत, तसेच अयोध्या दौर्‍यासाठी राज्यातून आम्ही १२ रेल्वेची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. आम्ही अयोध्या दौर्‍यात रीतसर तिकीट काढून जाणार असून राज्यातून ४० सहस्रांहून अधिक नागरिक येणार आहेत.