बेंगळुरू (कर्नाटक) – येथील श्री भारतमाता गुरुकुल आश्रम, सिस्टर निवेदिता अकादमी आणि श्री भारतमाता मंदिर यांचे संस्थापक विश्वस्त अन् आध्यात्मिक गुरु प्राध्यापक व्ही. रंगराजन यांना फ्लोरिडा (अमेरिका) येथील ‘योग संस्कारम् विद्यापिठा’ने ‘डॉक्टर ऑफ ऑनर्स’ ही पदवी प्रदान केली. ते योगी रामसूरतकुमार (तिरुवन्नमलाई) यांचे शिष्य आहेत. बेंगळुरू येथील शिवरथरीश्वर केंद्राच्या शताब्दी महोत्सवानिमित्त १७ एप्रिल या दिवशी आयोजित कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला. परोपकार, नेतृत्व, उच्च शिक्षण, धार्मिक परंपरांना चालना या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेऊन प्राध्यापक व्ही. रंगराजन यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.