जहांगीरपुरीतील अवैध बांधकामांवरील कारवाईवर स्थगिती कायम !

२ आठवड्यांनंतर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने येथील जहांगीरपुरीमधील अनधिकृत बांधकामांवर देहली महानगरपालिकेकडून करण्यात आलेली कारवाई स्थगित करण्याचा २० एप्रिलचा निर्णय कायम ठेवला आहे. ‘अवैध बांधकामे बुलडोझरने पाडली जातात आणि अशी कारवाई संपूर्ण देशात थांबवता येणार नाही’, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

२० एप्रिल या दिवशी जहांगीरपुरीमधील कारवाई चालू करण्यात आली असता त्याविरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती. २१ एप्रिलला या याचिकेवर पुढील सुनावणी झाली असता न्यायालयाने त्यावरील स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी २ आठवड्यांनी घेण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यांच्यासह संपूर्ण देशात चालू असलेल्या अवैध बांधकामांवरील कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही.