पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले सूत्र

१. आधुनिक विज्ञानवादी (कि विनाशवादी) ईश्वरतत्त्व विसरल्याने अवघ्या १०० वर्षांत त्यांनी विज्ञानाच्या आधारे पृथ्वीचा नाश केला !

ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद् धनम् ।।

– ईशावास्योपनिषद्, श्लोक १

अर्थ : जगातील सर्व जीवन ईश्वराने व्यापलेले आहे. ‘कर्ता-करविता तोच आहे’, या भावाने स्वतःच्या कर्तेपणाचा त्याग करून, मनुष्याने जीवनातील यथाप्राप्त भोग भोगीत जावे. कुणाच्याही धनाविषयी आसक्ती बाळगू नये.

जगातील कुठलाही पदार्थ अगदी अंशमात्राने सुद्धा परमेश्वररहित नाही. मनुष्य (चुकीने) या सर्व पदार्थांशी ममता आणि आसक्ती करतो. ते सर्व परमेश्वराचे आहेत आणि त्यांचा उपयोग केवळ परमेश्वरासाठीच केला गेला पाहिजे.’

या कार्यरूप नैसर्गिक जगात जे काही आहे, ते ईश्वराद्वारेच टिकून आहे. त्यामुळे त्याचा त्यागपूर्वक भोग घ्या. दुसऱ्या कुणाच्याही धनाची आकांक्षा करू नका. वेद भोग घेण्याला वर्ज्य मानत नाही; परंतु ते सांगतात, ‘‘त्यागाने भोग घ्या.’’ त्यागाने भोग घेणे म्हणजे आपल्या मर्यादित आवश्यकतेनुसार भोग्य वस्तू घ्यावी. शेष राहिलेली उपलब्ध असली, तरी ती वस्तू आपल्या अधिकारात घेऊ नका.

वरील मंत्र सांगतो की, ते (भोग्य पदार्थ) कुणाचे आहेत ? याचे उत्तर आधीच दिले आहे. येथे ज्या ज्या काही जड, चेतन वस्तू आहेत, त्या सर्व ईश्वराच्याच आहेत. ईश्वराने भोग्य पदार्थ विश्वातील त्याच्या सर्व मुलांसाठी बनवलेल्या आहेत; म्हणून आपल्या वाटणीचा तेवढाच भोग घ्या; परंतु उरलेले सोडून द्या. त्याची हाव धरू नका.

२. मनुष्याच्या अतीसंग्रहाच्या लालसी वृत्तीने प्रदूषण आणि कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे होत असलेला परिणाम

‘मा गृध:’ म्हणजे ‘लालसा आणि संग्रह याची दृष्टी’ अर्थात् ‘गिद्ध दृष्टी’ ठेवू नका. या अतीसंग्रहाच्या लालसी (गिद्ध) दृष्टीमुळेच पर्यावरणाचे प्रदूषण झाले आहे आणि काही गोष्टींचा संपूर्ण अभाव होण्याला कारणीभूत ठरली आहे. लोभामुळेच व्यक्ती भेसळ करतो. वस्तूंचा संग्रह करून अनैसर्गिक अभाव (कृत्रिम टंचाई) निर्माण करतो. त्यामुळे तो चढ्या भावाने वस्तू विकून अधिक धन कमवू शकेल. यामुळे पात्र असलेल्या व्यक्तींना त्या मिळत नाहीत, म्हणजेच त्या अभावग्रस्त होऊन जातात.

३. मनुष्याच्या लालसेने त्याची अस्मिता गमावल्याने निसर्गचक्राचे झालेले असंतुलन

संपूर्ण जगातील धनसंपत्ती आपल्याजवळ एकत्र करण्याच्या लोभामुळे काही लोक अंदाधुंदपणे भूमी खणणे, पर्वत, नद्या, वृक्ष इत्यादींना नष्ट करणे ही कृत्ये करत आले आहेत. निसर्गचक्र बिघडवत आहेत. खरेतर सृष्टीला चांगले (सुचारू रूपात) चालवण्याच्या उद्देशाने परमात्म्याने एक क्रम निर्धारित केला आहे.

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक १६

अर्थ : हे पार्था, जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांद्वारे भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो.

सारांश हा आहे की, त्यागपूर्वक संयमित (मर्यादित) भोग घ्या. अनावश्यक संग्रह करून अभाव उत्पन्न करू नये. निसर्गाचा योग्य उपभोग अवश्य घ्या; पण अतीशोषण करू नका. वर्तमान परिस्थितीत भोगाच्या लालसेमुळे निसर्गाचे एवढे शोषण होत आहे की, मनुष्याची अस्मिता संपूर्णतः नष्ट करण्याच्या थरापर्यंत पोचली आहे. वैश्विक तापमानात वृद्धी, पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर कमकुवत करणे, भूकंप, महापूर, अनावृष्टी, अतीवृष्टी हे सर्व मनुष्याच्या भोगलालसेचे परिणाम आहेत.

‘तेन त्यक्तेन भुञ्जीथा ।’ (ईशावास्योपनिषद्, श्लोक १) म्हणजे ‘त्यागाची भावना ठेवून भोग घ्यावा’, हाच यावर एकमेव उपाय आहे.

४. ईश्वराच्या सृष्टीचक्राचे पालन करत कर्म करण्यास सांगणारे ‘वेद’ भगवंतच !

श्रुति पुढील मंत्रामध्ये म्हणते,

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः ।

–  ईशावास्योपनिषद्, श्लोक २

अर्थ : या जगात शास्त्रनियत कर्मांचे आचरण करत १०० वर्षे जिवंत रहाण्याची इच्छा केली पाहिजे.

१०० वर्षांपर्यंत जीवित रहाण्याच्या इच्छेसहित कर्म करा; परंतु परमात्म्याने निर्माण केलेले सृष्टीचक्र चालवण्यासाठी आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याच्या रूपात करा. लालसेच्या (गिद्ध) दृष्टीने करू नका. असा निरापद, स्वास्थ्य संवर्धक पर्यावरण आणि विश्वात शांतीचा संदेश देणारे ‘वेद’ भगवंतच आहेत.’