पर्यायी भूमीचाही विचार करण्याचे मत व्यक्त !
नाशिक – ११ सहस्र वृक्ष असलेली गोवर्धन शिवारातील २५ एकर भूमी सिपेट प्रकल्पासाठी देण्याच्या निर्णयाविषयी आपण बैठक घेऊ आणि चौकशी करू, तसेच पर्यायी भूमी असेल, तर यातून मार्ग काढता येईल, असे आश्वासन १५ एप्रिल या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले. त्या नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या.
नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, सिपेट प्रकल्पामुळे ११ सहस्र वृक्ष तोडले जात असतील, तर ही गोष्ट गंभीर आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोडीविषयीच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. आपण या प्रकल्पाविषयी माहिती घेऊ, तसेच प्रसंगी बैठक बोलावून योग्य ते निर्देश देऊ.
काय आहे प्रकरण ?वर्ष २००६ मध्ये पनवेल येथे सिपेट प्रकल्प उभारण्यासाठी ४० कोटी रुपये व्यय येणार होता; मात्र भूमीअभावी तो प्रकल्प रहित होण्याच्या मार्गावर आहे. हा प्रकल्प खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिक येथे उभारण्यात येईल. त्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यशासनाला दिल्या आहेत. प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या भूमीवर १० वर्षांची ११ सहस्र झाडे आहेत. या झाडांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याने गोवर्धन ग्रामपंचायतीने त्या भूमीवर प्रकल्प उभारण्यासाठी हरकत घेत तसा ठराव ३ मासांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. |