मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणून हिणवणार्‍या राजकीय पक्षांना हिंदू मतपेटीद्वारे प्रत्युत्तर देतील !

मुंबई येथे वर्ष १९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांमध्ये स्थानिक मुसलमानांचा सहभाग नव्हता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत केले. हे सर्व बाँबस्फोट हिंदूबहुल भागांत झाले असतांनाही १२ वा स्फोट महंमद अली रोड येथे झाल्याची खोटी माहिती शरद पवार यांनी जनतेला त्या वेळी दिली होती. ‘असे बोललो नसतो, तर ज्यांना दंगल करायची आहे, त्यांचा उद्देश यशस्वी झाला असता’, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी २ दिवसांपूर्वी दिले. ‘खोटे बोलण्यामागे समाजहिताची भावना असल्याचे सांगणारे शरद पवार यांच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा ?’, हाही प्रश्नच आहे; कारण हे सांगत असतांना ‘मुंबई बाँबस्फोटात मुसलमानांचा हात नव्हता’, हे आणखी एक धडधडीत असत्य शरद पवार यांनी सांगितले. ‘मुंबईतील साखळी बाँबस्फोटात स्थानिक मुसलमान सहभागी नव्हते, तर ज्या स्थानिक मुसलमानांना न्यायालयाने शिक्षा सुनावली, तो चुकीचा निकाल होता’, असे पवार यांना वाटते का ?, हेही त्यांनी स्पष्ट करावे.

मुंबई बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम हाच मुळात मुंबईतील होता. या प्रकरणात फाशी दिलेला याकुब मेमन आणि बाँबस्फोटात सहभागी असलेले त्याचे इसा मेमन आणि रुबिना मेमन हे कुटुंबीय पाकिस्तानातून आले होते का ? या बाँबस्फोटांतील १२३ पैकी बहुतांश आरोपी मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातच रहात होते. या सर्वांना प्रशिक्षित करून हे बाँबस्फोट घडवण्यात आले. या बाँबस्फोटांत २५७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि ७०० हून अधिक जण घायाळ झाले. महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबियांवर ज्यांनी ही वेळ आणली, ते येथील धर्मांध होते. त्यांना वाचवण्याचा कुणाकडून अश्लाघ्य प्रयत्न होत असेल, तर त्याचा वैचारिक प्रतिवाद करायलाच हवा. त्याही पुढे जाऊन ‘खोटे बोललो नसतो, तर दंगल झाली असती’, असे पवार यांनी वक्तव्य करून एकप्रकारे ‘हिंदू हेच दंगलखोर असतात’, असे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. हे संतापजनक होय.

समाजहित नव्हे स्वहित !

वर्ष २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या; मात्र स्पष्ट बहुमत नसल्यामुळे राज्यात स्थिर सरकार येऊ शकत नव्हते. त्या वेळी निकालाची प्रक्रिया चालू असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी भाजपला विनाशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली; मात्र वर्ष २०१९ मध्ये ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण व्हावा, यासाठी भाजपला पाठिंबा दिला असल्याचा खुलासा शरद पवार यांनी केला. यावरून ‘महाराष्ट्राचे व्यापक हित’ वगैरे गोष्टींना शरद पवार यांच्या दृष्टीने काडीचेही मूल्य नाही, हेच यातून लक्षात येते. ‘महाराष्ट्र आणि जनता यांच्या हिताच्या वल्गना करून शरद पवार यांनी आतापर्यंत किती वेळा असत्याची कास धरली ?’, हे त्यांनाच ठाऊक. राजकारणात धूर्तपणा अवश्य असावा; मात्र तो लोककल्याणासाठी असेल, तर तो क्षम्य ठरू शकतो. शरद पवार यांनी सांगितलेले असत्य हे सत्तेसाठी असते, याचेच हे उदाहरण आहे. वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजप आणि शिवसेना यांना बहुमत मिळाल्यावर नागरिकांनी नाकारल्यामुळे सत्ता स्थापन करणार नसल्याची वल्गना करणारे पवार भाजप आणि शिवसेना यांच्यातील वादाच्या संधीचा लाभ उठवून महाविकास आघाडी स्थापन करून सत्तेत आले. त्यामुळे मुंबई बाँबस्फोटाच्या संदर्भात त्यांनी केलेले चुकीचे वक्तव्य आणि त्याविषयी दिलेले स्पष्टीकरण हिंदू कधीही स्वीकारणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे पाप !

वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी ‘भगवा आतंकवाद’ ही संकल्पना प्रथम मांडली. सध्या या प्रकरणाचा खटला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात चालू आहे. त्यामधील साक्षीदारांनी वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने हे षड्यंत्र रचल्याचे म्हटले आहे. असा हा खोटा ‘हिंदु आतंकवाद’ महाराष्ट्रात रुजवण्याचे पाप शरद पवार यांनीच केले. या खटल्यातील आतापर्यंत जबाब दिलेल्या सर्व आरोपींनी हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर दबाव आणल्याचे न्यायालयात सांगितले आहे. महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के.जैन यांनी तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मालेगाव स्फोटात २ पाकिस्तानी आणि ८ स्थानिक मुसलमान यांना अटक करण्यात आली होती; मात्र त्या वेळच्या महाराष्ट्रातील आघाडी सरकारने हे सत्य दाबले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेली इशरत जहाँ चकमकीत ठार झाली, तेव्हा ती निर्दाेष असल्याच्या वल्गना शरद पवार यांनी केली होती. हेच पवार जेव्हा हिंदू आतंकवादी नसल्याचे उघड झाल्यावर ‘ते निर्दाेष आहेत’, हे समाजाला ठणकावून का सांगत नाहीत ? ‘हिंदूंना आतंकवादी ठरवण्यात कोणते समाजहित दडले आहे ?’, हेही पवार यांनी स्पष्ट करावे. राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत मुसलमानांच्या लांगूलचालनाची परिसीमा गाठली. असे केल्याने समाजाला काय साध्य झाले ? अशाने धर्मांध अधिकाधिक उद्दामच झाले. ते आता पोलिसांनाही जुमानत नाहीत. याचे दायित्व शरद पवार यांनी घ्यायला हवे.

जे मुसलमान भारताप्रती निष्ठा बाळगतात त्यांचा सन्मान करायलाच हवा; मात्र ज्यांनी आतंकवादी कारवाया केल्या त्या देशद्रोह्यांचे गुन्हे पवार का लपवत आहेत ? शरद पवार हे महाराष्ट्रातील वयाने ज्येष्ठ आणि अनुभवाने श्रेष्ठ आहेत; मात्र ही ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !