प्रसिद्ध अब्जाधीश इलॉन मस्क यांची ४३ अब्ज डॉलर देऊन ट्विटर विकत घेण्याची सिद्धता !

संचालक मंडळावर नेमण्याचे आस्थापनाकडून नाकारण्यात आल्यानंतर मस्क यांनी घेतली भूमिका !

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘टेस्ला मोटर्स’ या अमेरिकी आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘स्पेसएक्स’ या अंतराळ संशोधनाशी संबंधित खासगी आस्थापनाचे मालक अन् जगद्विख्यात अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची सिद्धता दर्शवली आहे. मस्क यांना संचालक मंडळावर घेण्याचे ट्विटरने नाकारल्यावर त्यांनी ट्विटरला अब्जावधी डॉलर्स देऊन विकत घेण्याचीच सिद्धता दर्शवली.

मस्क यांना ट्विटरचे १०० टक्के मालकी हक्क विकत घ्यायचे आहेत. सध्या त्यांच्याकडे ट्विटरचा सर्वाधिक म्हणजे ९ टक्के समभाग आहे. त्यांनी एका समभागामागे (‘शेअर’मागे) ५४.२ डॉलर म्हणजे ४ सहस्र १३५ रुपये मोजण्याची सिद्धता दर्शविली. ट्विटर विकत घेण्यासाठी ते एकूण ४३ अब्ज डॉलर (३ लाख २८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) मोजायला सिद्ध आहेत.