ट्विटर मुक्त होणार?

ट्विटरद्वारे होणारी राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची गळचेपी रोखणे आवश्यक !

टेस्ला या जगप्रसिद्ध आस्थापनाचे मालक आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे स्वत:च्या विविध निर्णयांमुळे नेहमी प्रकाशझोतात असतात. ते ‘ट्विटर’ या सामाजिक माध्यम असणाऱ्या आस्थापनाचे मोठे भागधारक (९.२ टक्के समभाग) ठरले आहेत. त्यामुळे त्यांना या आस्थापनाचे संचालकपद मिळण्याची शक्यता होती; मात्र आस्थापनाने त्यांना संचालक मंडळावर घेण्यास नकार दिला आहे. यानंतर मस्क यांनी हे आस्थापनच खरेदी करण्यासाठी चक्क ३ लाख कोटी रुपयांची ‘ऑफर’ देऊन सगळ्यांना अचंबित केले आहे. इलॉन मस्क यांनी ही ‘ऑफर’ देताच ट्विटरच्या समभागांमध्ये एकदम ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्विटरलाही हे अनपेक्षित होते; मात्र त्यांच्यावर ते बंधनकारक नाही. ही संधी आस्थापनाच्या अन्य भागधारकांच्या हिताची आहे कि नाही ? याचा अभ्यास करून आस्थापन त्याविषयीचा निर्णय घेणार आहे. असो. हा झाला खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचा भाग !

मस्क यांना वेगळ्या कारणासाठी हे आस्थापन विकत घ्यायचे आहे. मस्क यांना ट्विटर सर्वांसाठी ‘ओपन सोर्स’ या प्रकारात आणायचे आहे. याचा अर्थ ट्विटरवर केलेल्या ट्वीट या सध्या केवळ आस्थापनाकडून नियंत्रित केल्या जातात. याऐवजी त्या लोकांनाही संपादित करण्याची सुविधा मस्क यांना उपलब्ध करून द्यायची आहे. मस्क यांची ‘ट्विटर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या दृष्टीने मुक्त व्यासपीठ करावे’, अशी इच्छा आहे. त्यांना ट्विटरच्या संगणकीय प्रणालीची रचना पालटायची आहे. याविषयी विविध मतप्रवाह असले, तरी मस्क यांनी मात्र मुक्त व्यासपिठाचे सूत्र पुष्कळ मनावर घेतले आहे.

ट्विटरवरील लिखाण

सर्वसामान्य ट्विटर वापरकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्या दृष्टीने काय लाभ-हानी होईल, याचा विचार करणे मात्र आवश्यक आहे. ट्विटर हे जगप्रसिद्ध सामाजिक माध्यम आहे आणि जगभरातील ३३ कोटी, तर भारतात अडीच कोटी लोक याचा वापर करतात. ट्विटर वापरणाऱ्यांमध्ये जगातील सर्वच प्रभावशाली आणि प्रसिद्ध व्यक्ती यांचा समावेश आहे. त्या प्रत्येकाचे काही लाख ते काही कोटी एवढे अनुयायी (फॉलोअर्स) आहेत. या प्रसिद्ध व्यक्ती ते सर्वसामान्य ट्विटर वापरकर्ता जे काही ट्वीट करतो, त्यामध्ये चांगले-वाईट, टीकात्मक, माहितीपर, कौतुकपर असे अनेक प्रकार आहेत. लिखाणाची भाषा सभ्य ते काहीशी टोकदार अशी असते. ‘प्रभावशाली व्यक्तींच्या ट्वीटद्वारे जर सामाजिक स्वास्थ्याला धोका संभावतो’, असे ट्विटरच्या संपादकीय गटाला वाटत असेल, तर त्याची संगणकीय प्रणाली कार्यरत होते आणि संबंधिताच्या अनुयायांची संख्या घटणे, त्यांचे ट्वीट अल्प लोकांपर्यंत पोचणे, त्यांचे ‘ट्विटर हँडल’ अकार्यरत होणे इत्यादी प्रकार होतात. काही वेळा ट्विटर खाते अघोषित कालावधीसाठी बंदही केले जाते; मात्र याविषयी पूर्वसूचना दिली जातेच असे नाही. मध्यंतरी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून ‘आपला आवाज दाबला जात आहे. लवकरच अन्य पर्यायी सामाजिक माध्यम आपल्याला वापरावे लागू शकते’, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या खात्यावर अघोषित कालावधीसाठी बंदी घालण्यात आली.

ट्विटरचा भारत आणि हिंदुद्वेष

 

भारतात कार्यरत राष्ट्र आणि धर्माभिमानी यांना ट्विटरचा वाईट अनुभव वारंवार येतो. राष्ट्रीय चेतना निर्माण करणारे ट्वीट्स, हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविषयी ट्वीट केल्यावर ट्विटरकडून त्यांच्या वैयक्तिक खात्यावर घाला घातला जातो. हा अनुभव सातत्याने घेतला आहे. एखाद्या राष्ट्र आणि धर्म प्रेमीचे ट्विटर खाते बंद करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. बांगलादेश येथे तेथील हिंदूंवर धर्मांधांकडून झालेल्या अत्याचारांची वस्तूस्थिती सांगणारे ट्वीट ‘इस्कॉन’ संप्रदायाकडून करण्यात आल्यावर त्यांचे खातेच बंद करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीकडून भारतातील हिंदूंवर विविध माध्यमांतून होणाऱ्या आघातांविषयी ‘हिंदु लाईव्हज् मॅटर’ (हिंदूंच्या जीवनाचा विचार केला पाहिजे) या ‘हॅशटॅग’ने ‘ट्रेंड’ (काही काळासाठी घडवलेली चर्चा) केल्यावर हा ‘हॅशटॅग’ ट्विटरकडून अदृश्य करण्यात आला होता. परिणामी तो त्या दिवसाच्या चर्चांमध्ये अग्रस्थानी येऊ शकला नाही. यातून हिंदुद्वेषी मानसिकताही दिसून येते. याउलट भारतद्वेषी आणि हिंदुविरोधी ट्वीट्स हटवली जात नाहीत, तसेच संबंधितांची खाती बंद करण्यात येत नाहीत, असे निदर्शनास येते. भारतात हिंदू बहुसंख्य असूनही या अन्यायाविरुद्ध कुणी काही करू शकत नाही, असे काही वर्षांपूर्वी झाले. राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी भारतियांची होणारी ही कुचंबणा पाहून ‘कू’ या भारतीय सामाजिक माध्यमाचा २ वर्षांपूर्वी प्रारंभ केला. त्याचा भारतियांनी मोठ्या प्रमाणात उपयोग चालू केला आहे, तरीही ट्विटरची लोकप्रियता अद्याप कायम आहे.

सध्या ‘ओपन सोर्स’ असणारा ‘विकिपीडिया’ हा माहितीचा मोठा स्रोत आहे. यावर लोक स्वत:कडील माहिती प्रसिद्ध करू शकतात. तसेच अन्य लोक या माहितीत भर घालू शकतात, संदर्भ देऊन ती संपादन करणे अथवा काढणे, असेही करू शकतात. याचा लाभ अधिकाधिक सत्य माहिती लोकांपर्यंत पोचण्यास होतो. जी माहिती उपलब्ध करणार तिला संदर्भ आवश्यक असल्याने काहीही दिले, असे होऊ शकत नाही. ‘इलॉन मस्क यांनाही हेच अपेक्षित असावे’, असे वाटते. ट्विटरच्या व्यवस्थापनाला आक्षेपार्ह वाटणारे लिखाण प्रत्यक्षात इतरांसाठी आक्षेपार्ह नसले, तरी ते ट्विटरवरून बाजूला केले जाऊ शकते. याविषयी सर्वसामान्य मात्र अंधारात रहातो. हेच मस्क यांना नको आहे. मस्क यांच्या संकल्पनेचा लाभ होणारच आहे, यात संशय नसला, तरी काही हानीही यात संभवू शकते. ज्यामध्ये योग्य लिखाणालाही आक्षेप घेतला जाऊन निवळ विरोधासाठी विरोध म्हणून तो संपादित केला जाऊ शकतो, अयोग्य माहिती पोचू शकते. अन्य अडचणी प्रत्यक्ष ट्विटरची धोरणे पालटल्यावरच लक्षात येऊ शकतील. तरी ‘मस्क यांच्या रूपाने ट्विटरसारख्या मोठ्या सामाजिक माध्यमावर नियंत्रण ठेवू शकणाराही कुणीतरी आहे’, याची जाणीव ट्विटरला झाली असेल. भारतियांनी यातून बोध घेऊन भारतीय सामाजिक माध्यमांना लोकप्रिय करावे, ही अपेक्षा !