‘गोशाळा अर्थव्यवस्था’ यांवर नीती आयोग करत आहे विचार !

शेणापासून जोडउत्पादने करण्यावर अभ्यास चालू !  

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – गोशाळांची व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी त्यांच्या अर्थशास्त्रावर अहवाल सिद्ध करण्याची सूचना नीती आयोगाने ‘नॅशनल कौन्सिल ऑफ अ‍ॅप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च’ला (‘एन्सीएईआर’ला) केली आहे. ‘आम्ही केवळ गोशाळांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या शक्यता तपासून पहात आहोत. शेणाच्या जोडउत्पादनांसाठी काय करता येईल, याचा अभ्यास चालू आहे’, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी दिली. भटक्या गायींशी संबंधित विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी नीती आयोग ‘गोशाळा अर्थव्यवस्थे’वर विचारविनिमय करत आहे.

रमेश चंद यांच्या नेतृत्वाखालील अधिकार्‍यांच्या एका पथकाने उत्तरप्रदेश, राजस्थान आणि देशाच्या अन्य भागांतील मोठ्या गोशाळांच्या सद्य:स्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वरील माहिती दिली.

रमेश चंद म्हणाले की, १० ते १५ टक्के गायी अगदी अल्प दूध देतात. त्यातून मजुरी, त्यांचा चारा आणि त्यांच्यावरील उपचारांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे ‘बायो-सीएन्जी’ बनवण्यासाठी गायीच्या शेणाचा वापर केला जाऊ शकतो. म्हणून आम्ही अशा प्रकारच्या शक्यतांचा विचार करत आहोत.