विद्यार्थ्यांनो, अभिजात संगीत साधनेत रियाजाचे (सरावाचे) महत्त्व लक्षात घेऊन नियमितपणे रियाज करा !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत.

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (३१.३.२०२२)


पू. किरण फाटक

१. रियाज म्हणजे काय ?

‘भारतीय अभिजात संगीताची साधना करण्याची पद्धत म्हणजे रियाज. रियाज म्हणजे सराव. स्वर, ताल आणि लय यांच्या सतत सहवासात असणे, म्हणजे रियाज. यात श्रवण, मनन, चिंतन (विचार), रटन (संगीतातील स्वरालाप सतत म्हणत रहाणे), वाचन आणि प्रत्यक्ष गायन-वादन येते.

२. रियाजाने काय साध्य होते ?

रियाजाने कलाविष्कारात सहजता आणि उत्स्फूर्तता येते. रियाजामुळे स्वराच्या केंद्रबिंदूकडे पहाण्याची दृष्टी आणि काळाच्या गतीमानतेकडे पहाण्याची वृत्ती विकसित होते, तसेच निर्गुण, निराकार अन् अस्पर्श अशा प्रवाही सांगीतिक ऊर्जेला सगुणात परिवर्तन करण्याची किमया साधते.

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

३. रियाजात कशाचा अभ्यास करावा लागतो ?

रियाजात मुख्यत्वे स्वर आणि लय यांवर प्रभुत्व मिळवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. ‘काळाच्या गतीतील सौंदर्याचा स्वरांच्या चौकटीत राहून आस्वाद कसा घेता येईल आणि कसा देता येईल ?’, याचाही सूक्ष्मातून अभ्यास करावा लागतो. स्वरसंवाद, स्वरांची गुणवत्ता (दर्जा) आणि स्वरांचे बहुरंगी व्यक्तीमत्त्व यांचा खोलवर जाऊन अंदाज घ्यावा लागतो. हे सगळे साध्य करण्यासाठी जे जे करावे लागते, त्याला ‘रियाज’ म्हणतात.

४. रियाज हा व्यक्तीनुरूप वेगळा असणे आणि गुरु शिष्याला त्याच्यासाठी रियाजाची एक विशिष्ट पद्धत ठरवून देत असणे

रियाज हा व्यक्तीनुरूप वेगळा असतो. जसे अध्यात्मात अधिकारी व्यक्ती शिष्याला विशिष्ट मंत्राची दीक्षा देतात, त्याप्रमाणे संगीतात गुरु प्रत्येक शिष्याला रियाजाचा वेगळा कानमंत्र देतात. शिष्याचा आवाज, प्रकृती, स्वभाव, सच्चेपणा, आकलनशक्ती, आवडी-निवडी इत्यादी लक्षात घेऊन गुरु त्याला त्याच्यासाठी रियाजाची एक विशिष्ट पद्धत ठरवून देतात; म्हणून रियाजाची एक सामान्य पद्धत सर्वांसाठी ठरवून देणे जरा कठीण असते. जसे ज्योतिष हे सामान्यपणे सर्वांसाठी सांगता येत नाही (कारण प्रत्येकाची कुंडली वेगळी असते), तसेच रियाजाचे असते.

५. रियाजासंबंधी मनात निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

५ अ. प्रश्न – रियाज प्रतिदिन एका विशिष्ट ठिकाणी बसून विशिष्ट वेळी आणि विशिष्ट काळ करावा का ?

५ अ १. उत्तर

अ. प्रत्येक क्षणी ‘आपण संगीत शिकत आहोत’, याची आठवण हवी. त्याला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ‘अनुसंधान’असे म्हणतात.

आ. जशी आणि जेवढी जागा मिळेल, तशा आणि तेवढ्या जागेत रियाज करावा.

इ. उठता-बसता आणि चालता-फिरता सूर डोक्यात घोळत असावेत. सदैव गुणगुणणे चालू असावे.

ई. वेगवेगळ्या माध्यमांतून निर्माण होणारी लय जाणवत असावी, उदा. फिरणारा पंखा, आगगाडीचा आवाज, नळातून पाणी थेंब थेंब ठिबकण्याची लय, पक्ष्यांच्या आवाजातील स्वर आणि लय इत्यादी.

उ. रियाज नेहमी चालू असावा. कधी श्रवण, कधी चिंतन, कधी मनन, तर कधी गुणगुण या माध्यमांतून स्थळ-काळाचे भान ठेवून रियाज चालू ठेवावा. लोक ‘पागल’ (वेडा) म्हणतील, ‘फुकट गेला’, असे म्हणतील; पण त्याकडे लक्ष देऊ नये.

ऊ. रियाज बागेत झाडाखाली बसूनही करता येतो, तसेच स्वयंपाक करतांनाही करता येतो; मात्र यासाठी ‘मी संगीत शिकत आहे’, ही जाणीव सतत मनात जागृत असायला हवी.

ए. जर आपण आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी नोकरी करत असू, तर तेथे मात्र प्रामाणिकपणे काम करावे. नोकरीच्या मध्ये संगीत येऊ नये; कारण हिंदीत ‘सर सलामत, तो पगडी पचास’, अशी म्हण आहे. येथे याचा अर्थ आहे, ‘आपल्या पोटा-पाण्याची सोय आधी पहावी आणि नंतर संगीतासारखे छंद जोपासावेत.’

५ आ. प्रश्न – रियाज पेटी किंवा तानपुरा यांपैकी कोणत्या वाद्यासह करावा ?

५ आ १. उत्तर

अ. आरंभी स्वरज्ञान होईपर्यंत पेटीचे साहाय्य घ्यावे; पण एकदा स्वरांतरे कळू लागली की, तानपुरा घ्यावा. आजकाल तानपुरा भ्रमणभाषमध्ये उपलब्ध असतो.

आ. पेटीचे सूरही बऱ्याच वेळा बेसूर असतात; म्हणून नियमितपणे पेटी स्वरांत लावून (ट्यून करून) घ्यावी.

इ. रियाज डोळसपणे करावा. प्रत्येक स्वराचा नाद जाणून घेऊन तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

५ इ. प्रश्न – रियाज मित्रांसह सामूहिकरित्या करावा कि एकट्यानेच करावा ?

५ इ १. उत्तर

अ. मित्र जर आपल्या संगीताच्या आवडीला जपणारा आणि मिळूनमिसळून रहाणारा असेल, तर दोघांनी मिळून रियाज करावा. यात गप्पा जास्त आणि रियाज अल्प, असे होता कामा नये.

आ. मित्रांसह संगीताविषयी चर्चा अवश्य करावी. दोन मित्र एकमेकांना पूरक असावेत.

इ. मित्राने सांगितलेल्या चुका न चिडता मान्य करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. माणूस चुकांमधून शिकत असतो.

५ ई. प्रश्न – रियाज मोठ्या आवाजात करावा कि लहान आवाजात करावा ?

५ ई १. उत्तर : आपल्या आवाजाची श्रेणी (range of voice) आणि श्वासाची शक्ती समजण्यासाठी शुद्ध आकारात कुणाला त्रास होणार नाही, इतपत मोठ्या आवाजात रियाज करावा.

६. रियाजाच्या संदर्भातील अन्य सूत्रे

अ. आवाजात सुरीलेपण येईपर्यंत तेच तेच गात रहावे, उदा. शुद्ध स्वर (टीप १), अलंकार किंवा पलटा (टीप २)

टीप १ – जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’, असे म्हणतात.

टीप २ – विशिष्ट क्रमाने केलेल्या स्वररचनेस ‘अलंकार’ किंवा ‘पलटा’, असे म्हणतात.

आ. सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रियाज करावा. आपले डोके चालवू नये; मात्र मनात शंका आल्यास गुरूंकडून तिचे समाधान अवश्य करून घ्यावे.

‘रियाज करोगे, तो राज करोगे’, असे संगीतातील महनीय मंडळींनी म्हटले आहे. ते सार्थच आहे. तेव्हा मंडळी ! चला, रियाजाची वेळ झाली. बसूया रियाजाला !’

– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (११.६.२०२१)