नवाब मलिक यांच्या मालमत्ता ‘ईडी’कडून कह्यात !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मालमत्ता कह्यात घेतल्या आहेत. मलिक यांच्या ८ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.

या मालमत्तांमध्ये कुर्ल्यात असलेल्या गोवावाला कम्पाऊंड येथील व्यावसायिक जागा, कुर्ला (पश्चिम) येथील व्यावसायिक जागा अन् ३ खोल्या, वांद्रे (पश्चिम) येथील २ खोल्या आणि धाराशीवमधील १४८ एकर भूमी यांचा समावेश आहे. या मालमत्ता नवाब मलिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या नावावर आहेत.

‘ईडी’ने दाऊद इब्राहिम आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्या मालकीची भूमी खरेदी केल्याचा आरोप आहे. यामध्ये आर्थिक घोटाळा आणि गुन्हे जगताशी (‘अंडरवर्ल्ड’शी) संबंधित अन् वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटातील आरोपींशी संबंधित मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप आहे. तसेच ईडीने मलिक यांच्यावर आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य केल्याचा (‘टेरर फंडिंग’चा) आरोपही केला आहे.

आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्याची सिद्धता दर्शवली आहे.