चीनच्या अर्थव्यवस्थेला लागणारा भारताचा हातभार बंद होणे आवश्यक ! – गौतम बंबावाले, माजी राजदूत

गौतम बंबावाले

पुणे – चीनने गेल्या ४० वर्षांत केलेली प्रगती तेथील एकाधिकारशाहीमुळे झाली आहे. त्यामुळे प्रगतीचा आलेख वाढत असला, तरी तेथील लोकशाही धोक्यात येत आहे. भारताने चीनशी संबंध प्रस्थापित केल्याने त्यांची ४५ सहस्र ७०४ कोटी १० लाख रुपयांची (६० बिलियन डॉलर्सची) आर्थिक उलाढाल होत आहे; मात्र सीमावादावर चीन माघार घ्यायला सिद्ध नसल्यास भारतानेही त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे बंद करणे आवश्यक आहे, असे मत भारताचे माजी राजदूत गौतम बंबावाले यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, ‘सेंटर फॉर चायना ॲनॅलिसिस अँड स्ट्रॅटेजी’ आणि ‘सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चीनचा उदय आणि जागतिक राजकारणावरील परिणाम’ या विषयावर २ दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बंबावाले बोलत होते.

या वेळी विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.