शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदुर्ग – काही अधिकारी आणि दलाल जिल्ह्यातील भूमीच्या व्यवहारांत बनावट कुळे उभी करून त्या हडप करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली. याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह उपजिल्हा प्रमुख अमरसेन सायत, नागेंद्र परब, रूपेश राऊळ, अशोक सावंत आणि चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बनावट कुळे उभी करून जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या भूमी हडप करण्याची विकृती जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. असाच प्रकार सावंतवाडी तालुक्यातही घडल्याचे समोर आले असून अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे कामानिमित्त जिल्ह्याबाहेर रहाणार्या नागरिकांची माहिती मिळवून त्यांच्या भूमीच्या कागदपत्रांत बनावट कुळ दाखवत आहेत. या प्रकाराला आळा बसणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ‘चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या भूमींच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल आणि चौकशीत दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्यात येईल ’, असे आश्वासन दिले.