जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांकडे देण्याची किरीट सोमय्या यांची ‘ईडी’कडे मागणी !

मुंबई – आर्थिक अपहाराच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतलेला सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखाना हानी झालेल्या शेतकऱ्यांच्या कह्यात द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ७ एप्रिल या दिवशी शेतकऱ्यांसह अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन सोमय्या यांनी ही मागणी केली.

शिखर बँकेकडून या साखर कारखान्याला कर्ज दिले होते. बुडीत निघाल्यामुळे कर्जाची रक्कम फेडण्यासाठी हा कारखाना विकण्यात आला. संचालकपदावरील अजित पवार यांनी हा कारखाना त्यांच्या नातेवाइकांना बाजारमूल्यापेक्षा अल्प किमतीत विकल्याचा आरोप त्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणाची राज्य सरकारकडून चौकशी करण्यात आली; मात्र पोलिसांनी संचालकांना ‘क्लीन चीट’ दिली. स्वत: अजित पवार यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. काही मासांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने जरंडेश्वर साखर कारखाना कह्यात घेतला आहे.