धारवाड (कर्नाटक) – ३० मार्च २०२२ या दिवशी धारवाड जिल्ह्यातील हुब्बळ्ळी येथील श्रीमती अरुणा गुरुनाथ असूटी, श्रीमती वसुंधरा निडगुंदी आणि धारवाड येथील सौ. गायत्री नागठाण या ३ साधिका जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाल्याचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशीनाथ प्रभु यांनी घोषित केले. या वेळी उपस्थित साधकांची भावजागृती झाली. सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी या तिन्ही साधिकांना श्रीकृष्णाचे छायाचित्र देऊन त्यांचा सत्कार केला.
एकलव्याप्रमाणे साधना करणाऱ्या श्रीमती अरुणा असूटी यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !
सतत शिकण्याची वृत्ती, निर्भीडता, नम्रता आदी दैवी गुण असलेल्या हुब्बळ्ळीच्या श्रीमती अरुणा असूटी (वय ७५ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. श्रीमती अरुणा असूटी मागील १७ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. पतीचे झालेले निधन आणि आजारपण याांमुळे त्या काही काळ सेवेपासून दूर होत्या; परंतु त्या काळातही त्यांनी त्यांची व्यष्टी साधना चांगली केली.
कठीण प्रसंगातही त्यांचा साधनेच्या प्रवासाविषयी पू. रमानंद गौडा म्हणाले की, अनेक वर्षे साधकांच्या संपर्कातही नसतांना त्यांनी एकलव्याप्रमाणे साधना केली.
श्रीमती वसुंधरा निडगुंदी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
त्यागी वृत्ती, इतरांचा विचार करणे, कृतज्ञताभाव असलेल्या हुब्बळ्ळीच्या श्रीमती वसुंधरा मोहनराव निडगुंदी (वय ७८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यांनी लहान वयातच पू. रानडे महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली असून त्या सनातनच्या साधकांच्या संपर्कात असतात.
सौ. गायत्री नागठाण यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
प्रेमभाव, संपर्क कौशल्य, स्वीकारण्याची वृत्ती, गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या धारवाड येथील सौ. गायत्री ईरण्णा नागठाण (वय ६० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.
‘गुरुसेवेची पुष्कळ आवड असेल आणि तीव्र इच्छाशक्ती असेल, तर कोणत्याही परिस्थितीवर विजय प्राप्त करून गुरुसेवा करू शकतो. याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे सौ. गायत्री ईरण्णा नागठाण या आहेत’, असे उद्गार पू. रमानंद गौडा यांनी काढले.