सातारा, ५ एप्रिल (वार्ता.) – ‘महाराष्ट्र राज्य गवंडी समाज सेवा संघा’ची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. संघाच्या अध्यक्षपदी अहमदनगर येथील गवंडी समाजातील प्रतिष्ठित, दानशूर आणि कर्तव्यपरायण प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. अविनाश आळंदीकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
३ एप्रिल या दिवशी पंढरपूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील ज्येष्ठ समाजबांधव मनोज राजापूरे होते. या बैठकीत संघाचे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, संचालक आदींच्या निवडी करण्यात आल्या. संघाच्या उपाध्यक्षपदी सोलापूर येथील सौ. जयश्री बंडे आणि पुणे येथील भीमाशंकर गवंडी यांची वर्णी लागली. खजिनदारपदी वैराग येथील सतीश शिराळकर, तर सचिवपदी पळसदेव येथील मिथून घंटे यांना संधी देण्यात आली. संघाच्या राज्य कार्यकारिणीवर सातारा जिल्ह्यातून संतोष कोल्हापुरे, मनोज चाकणकर, तर कराड येथून संजय गवंडी-कार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गवंडी समाजाचे आराध्यदैवत भगवान बालाजी आणि मूळपुरुष राजा भगीरथ यांच्या प्रतिमांचे पूजन अन् दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन मिथुन घंटे यांनी केले.