थकित वीजदेयकापोटी अधिकार्याला शिवीगाळ केल्याचे प्रकरण
संभाजीनगर – बंगल्याच्या ३ लाख ५० सहस्र रुपयांच्या थकित वीजदेयकापोटी वीज खंडित करणार्या महावितरण अधिकार्याला भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शिवीगाळ केली होती. याचा १ ऑडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला होता. यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ३१ मार्च या दिवशी बबनराव लोणीकर यांच्या घरावर शेण फेकून स्वतःचा रोष व्यक्त केला. लोणीकर यांच्यासारख्या उत्तरदायी व्यक्तीने असे बोलणे निषेधार्थ आहे, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
याविषयी बबनराव लोणीकर म्हणाले की, संभाजीनगर येथे माझा एक बंगला आहे. त्याचे देयक भरले असून वीज खंडित झालेली नाही. कोणीतरी खोटी ऑडिओ क्लिप सामाजिक माध्यमांवर टाकून माझी अपकीर्ती करत आहेत. सध्या महावितरण करत असलेली कारवाई चुकीची असून त्यामुळे शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काय म्हणाले होते बबनराव लोणीकर ?
वीज अभियंत्याशी भ्रमणभाषवर बोलतांना बबनराव लोणीकर म्हणाले, ‘‘चोरांना पकडत नाही आणि देयक भरणार्याला त्रास देतात. माजले का तुम्ही ? तुमच्यावर आयकर विभागाची धाड पडेल. तुमच्या संपत्तीची कुंडली काढणार आहे. ऊर्जामंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करीन.’’