मुसलमानांचे तुष्टीकरण आणि जाती-धर्मात फूट पाडण्याचेच राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणतात…
कोल्हापूर, ३ एप्रिल (वार्ता.) – सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. गेल्या काही वर्षांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पडताळावा. या पोटनिवडणुकीत जातीयवाद निर्माण करणाऱ्या पक्षाला पंचगंगा नदीच्या जवळदेखील येऊ देऊ नये. जाती-धर्मात कटुता आणणाऱ्या विचाराला माझे आजोळ (कोल्हापूर) थारा देणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (समर्थ रामदासस्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु मानण्यास नकार देणे, संभाजी ब्रिगेडसारख्या जात्यंध संघटनेला पाठीशी घालणे, नेहमीच आरक्षणाचे राजकारण करणे अशा कृती करणारा आणि नेहमीच मुसलमान तुष्टीकरणाची भूमिका घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशाप्रकारे राजकारण करतो हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे अशा पक्षाला जनतेनेच मतपेटीच्या माध्यमातून योग्य उत्तर दिले पाहिजे ! – संपादक)
१. लोकशाही बळकट करायची असेल, तर विरोधीपक्ष सक्षम असायला हवा, नाहीतर देशाची अवस्था रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासारखी होऊन बसेल. सत्तेचा अयोग्य वापर करावा, या संस्कारात आम्ही वाढलो नाही. (ज्या पक्षाचे माजी गृहमंत्री कारागृहात आहेत, अल्पसंख्यांकमंत्री कारागृहात आहेत, पक्षातील जवळपास प्रत्येक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, पक्षाचे मंत्री हिंदुत्वनिष्ठांना घरी बोलावून मारहाण करतात, मंत्र्यांवर तीन विवाह केल्याचे जाहीर आरोप होतात, पक्षातील प्रत्येक मंत्री, नेते, कार्यकर्ते यांच्यावर प्रतिदिन कुठे ना कुठे भ्रष्टाचार, बलात्कार केल्याचे आरोप होतात, अशा पक्षाच्या प्रमुखांना ‘संस्कार’ वगैरे शब्द वापरणे शोभते का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
२. लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही. नेत्यांपेक्षा नागरिकांमध्ये लोकशाहीविषयी अधिक प्रेम असते. एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावरून कारवाई केली जाते. कुणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई केली जाते, हे लोकांना समजते, याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. (उलट अशा प्रकारची वक्तव्ये करून शरद पवार स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे गुन्हे झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत ! – संपादक)