आज १ एप्रिल २०२२ या दिवशी ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन’ आहे. त्यानिमित्त…
छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आज गोष्ट किंवा साहसकथा या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शंभूराजांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात यश कशामुळे आले, तो त्यांच्या साधनेचा, म्हणजे त्यांनी जगून दाखवलेल्या अध्यात्माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंदर्भात विविध मान्यवरांनी केलेले विवेचन येथे देत आहोत.
१. पुत्रकामेष्टी यज्ञ करणारे धर्मज्ञ छत्रपती संभाजी महाराज !
शिवयोगी, केशव आणि गेशभट यांनी छत्रपती संभाजी महाराजांना तुळजाभवानीची किंवा देवाची उपासना करण्यास सांगितले. छत्रपती संभाजी महाराज शिवयोग्यांना मान आणि दान देत असत. शिवयोग्यांच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजी महाराज यांनी पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ करून बराच दानधर्म केला होता. लहानपणापासून छत्रपती संभाजी महाराजांना पुराणाची आवड होती. त्याच्या विद्वत्तेमुळेही त्यांना ‘पंडितराव’ म्हटले असणे शक्य आहे. केशव पंडित यांनी आपल्या ‘राजारामचरितम्’ या काव्यात ‘सकलशास्त्र विचारशील आणि धर्मज्ञ शास्त्रकोविद’ असे छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन केले आहे.
(साभार : संभाजीराजांचे धार्मिक धोरण, ‘शिवपुत्र संभाजी’, लेखक – डॉ. (सौ.) कमल गोखले)
२. देवतांचे स्तवन आणि धर्मशास्त्राचा अभ्यास
‘छत्रपती संभाजीराजांनी लिहिलेल्या ‘बुधभूषण’ या ग्रंथाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात पूर्वजांचा त्रोटक इतिहास, भवानीमातेचे आणि अन्य देवतांचे स्तवन अन् संस्कृत आशीर्वादरूपी वचने आहेत. दुसर्या भागात मत्स्यपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, कामदकीय नीतीसार यांतील वचने आहेत. तिसर्या भागात संकीर्ण माहितीचा संग्रह आहे.’
– डॉ. जयसिंग पवार (साभार : ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’)
🚩१ एप्रिल, २०२२ म्हणजे एकमेवाद्वितीय ‘धर्मवीर #छत्रपती_संभाजी_महाराज ’ यांचा ३३३ वा बलीदानदिन !
सनातन प्रभात नियतकालिकांकडून जाज्वल्य धर्माभिमान असणाऱ्या या महान हिंदु राजाला व्हिडिओच्या माध्यमातून मानवंदना !#SambhajiMaharaj #बलिदान_दिवस pic.twitter.com/VYJATusAwQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2022
__________________________
३. शाक्तपंथीय साधना करण्यामागील छत्रपती संभाजी महाराज यांचा उद्देश !
‘‘बाळाजीकाका, मनुष्याच्या शुद्ध आचरणासाठीच प्रत्येक धर्म आणि पंथ झटत रहातात. पुढे स्वार्थासाठी काही जण धर्माला वेठीस धरून वाममार्गाचा अवलंब करतात; परंतु धर्मपंथाला आलेले विपरित स्वरूप म्हणजे मूळ धर्म नसतो. त्यामुळे शाक्तपंथियांमध्ये वाममार्ग संचारला आणि वैदिक जातीधर्माला त्याची लागणच झालेली नाही, असे समजणे मोठे धारिष्ट्याचे ठरेल !’’, असे शंभूराजे बोलले. संभाजीराजे पुढे सांगू लागले, ‘‘शाक्तपंथ आमच्या लेखी दुसरे तिसरे काहीही नसून ती जगन्मातेची म्हणजे शक्तीची पूजा आहे ! त्यात आम्हा भोसल्यांची कुळमाता म्हणजे तुळजाभवानी आहे. ती शस्त्रधारी, दुष्टांचे निर्दालन करणारी आहे. तिला नैवेद्यच लागतो तोच मुळी रक्तामांसाचा !’’ बोलता बोलता शंभूराजे अडखळले; दाटल्या कंठाने बोलले, ‘‘आज आमचे गुन्हे नसतांनाही अनेकांच्या दुष्ट, कुत्सित नजरा आम्हांला भोवतात. अनेकांचे शिव्याशापांचे, तळतळाटाचे आम्ही धनी ठरतो. अशा दुष्ट शक्तींशी मुकाबला करायचा, तर कुणाच्या तरी वरदहस्ताची, आशीर्वादाची आवश्यकता लागतेच बाळाजीकाका.’’
(साभार : ‘संभाजी’, लेखक – श्री. विश्वास पाटील)
४. छत्रपती संभाजीराजांची स्थुलातून सूक्ष्माकडे प्रगती !
‘धैर्य हा छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्यसाधारण विशेष गुण असला, तरी त्यांचीही स्थुलाकडून सूक्ष्माकडे अशी उत्तरोत्तर उत्क्रांती झालेली दिसून येईल. बालपणी औरंगजेबाची मल्लयुद्धाची आज्ञा त्यांनी ठोकरून लावली, ते बालसुलभ निसर्गसिद्ध (constitutional) धैर्य होते. त्यांनी अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान दिले, ते तारुण्यातील उद्दाम धैर्य होते. पुढे सात वर्षे त्यांनी अनेक शत्रूंविरुद्ध प्राणपणाने झुंज दिली, ते विराचे धैर्य होते आणि अखेरच्या क्षणी शस्त्र, सैन्य, राज्य एवढेच नव्हे, तर त्यांची डोळेसुद्धा त्यांच्यापासून हिरावून घेतल्यावर त्यांनी मृत्यूला तोंड दिले, ते त्यांचे हुतात्म्याचे धैर्य होते ! छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म्याची अशा चढत्या क्रमाने उत्क्रांती ज्या क्षणी पूर्ण झाली, त्याच क्षणी त्याला खाली ओढणारे पार्थिवतेचे बंध गळून पडले आणि ते मुक्त झाले !’
(साभार : ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’, लेखक – प्रा. श.श्री. पुराणिक)