न्यायालयाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

धार्मिक स्थळांवर भोंगे लावू नयेत, असा सर्वाेच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांना उपमुख्यमंत्र्यांची भूमिका मात्र गुळमुळीत ! – संपादक

अजित पवार

मुंबई – सध्या विकासाची सूत्रे सोडून अन्य सूत्रांवर अनेकदा चर्चा केली जाते. कुणी कुठले सूत्र घ्यावे, हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार कुठलेही असो, सर्वाेच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय जो आदेश देईल, त्यावर सरकारला कार्यवाही करावी लागते. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, तो वाचला नाही; मात्र त्याची माहिती घेऊन न्यायालयाचा अवमान होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मशिदींवरील भोंगे बंद करण्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना व्यक्त केले.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘धार्मिक सलोखा रहाण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत. पक्षाच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडावी. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असतांना जग कुठला विचार करत आहे आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवत आहोत ?, कुठल्या विषयाला महत्त्व देत आहोत ? याचे आत्मचिंतन झाले पाहिजे. जनतेनेही या विषयाचा अधिक गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.


मशिदींवरील ध्वनीक्षेपक बंद करण्याची भाजपची मुंबईच्या आयुक्तांकडे मागणी !

मशिदींवरील ध्वनीक्षेपक न लावण्याविषयी सर्वाेच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांना त्यावर स्वत:हून कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडे अशी मागणी का करावी लागते ?

गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांना अनुमती मिळावी, यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने २९ मार्च या दिवशी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली. या वेळी मशिदींवरील ध्वनीक्षेपक लावण्यावर बंदी घालण्याची मागणीही भाजपच्या वतीने करण्यात आली. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

याविषयी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, अजानचा भोंगा दिवसातून ५ वेळा वाजतो. त्याला भाजपचा विरोध आहे. आम्ही धर्माला विरोध करत नाही; परंतु धर्माच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हे केले जात आहे, त्याला आमचा विरोध आहे.