बीरभूमच्या प्रकरणावरून बंगाल विधानसभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये हाणामारी

भाजपचे ५ आमदार निलंबित

  • तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतांनाच आता विधानसभेतही तिच स्थिती असणे, हे राज्यात आता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचीच वेळ आली असल्याचे द्योतक आहे ! – संपादक
  • विधानसभेत हाणामारी करणार्‍यांना निवडून देणारी जनताही याला तितकीच उत्तरदायी आहे ! – संपादक

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या विधानसभेत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी भाजपच्या ५ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या आमदारांमध्ये सुवेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष आणि दीपक बर्मन यांचा समावेश आहे. भाजपचे आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपने आहे, तर तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार यांनी ‘हाणामारीत मी घायाळ झालो’, असा दावा केला आहे.

या हाणामारीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामध्ये आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचे दिसत आहे. यासह ते एकमेकांचे शर्ट फाडत असल्याचेही दिसत आहे. या घटनेनंतर भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. ‘आम्ही बीरभूममधील घटनेवर चर्चेची मागणी करत असतांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आम्हाला मारहाण केली’, असे सांगत ते सभागृहातून बाहेर पडले. बीरभूम येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याची हत्या झाल्यानंतर ८ जणांना जिवंत जाळण्यात आले होते.