धुळे येथे दोन दिवसीय ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा पार पडली !
धुळे, २७ मार्च (वार्ता.) – अर्जुनाची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता सांगून धर्मसंस्थापनेचे महान कार्य करून घेतले. याचप्रमाणे आपल्या मनातील विचार सांगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक आहे. आपल्या मनातील विषय, चिंता आपण मित्राजवळ बोलून दाखवल्यास आपले मन हलके होते आणि मनावरील ताणही दूर होतो, असे मार्गदर्शन सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे आयोजित दोन दिवसीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला प्रारंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच धुळे जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या. कार्यशाळेस जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथील पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात मनमोकळेपणाने बोलल्याने होणारे लाभ आणि न बोलण्यामुळे होणारी हानी, जीवन आनंदी बनवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया योग्य पद्धतीने कशी राबवावी ? मनाचे कार्य, तसेच मनात नामजपाचा संस्कार कसा रुजवावा ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
समारोपीय सत्रात हिंदु राष्ट्र संघटक आचारसंहिता कशी असावी ? राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन, त्याची नियमावली आणि पूर्वसिद्धता यांविषयी समितीचे श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले, तर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आगामी भीषण आपत्काळ कसा असेल ?, त्यासाठी औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ? भाजीपाल्याची लागवड कशी करावी ? जीवनावश्यक वस्तूंचा साठा कसा करावा ? प्रथमोपचार प्रशिक्षण, अग्निशमन प्रशिक्षण, प्राणवहनशक्ती उपचार इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासह जीवन सुखमय होण्यासाठी आणि आनंदी होण्यासाठी, तसेच पुढील आप्तकाळाला सामोरे जाण्यासाठी अखंड साधना अन् भक्ती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यशाळेचा समारोप ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आला.
धर्मप्रेमींचे अभिप्राय
१. कार्यशाळेच्या माध्यमातून प्रेमभाव अनुभवता आला. बोलण्याची भीती अल्प झाली. – श्री. मंदार जोशी, जळगाव
२. मी आपुलकीचे नाते जोडण्यासाठी आले. पुष्कळ प्रेम आणि आनंद मिळाला. – अधिवक्ता गायत्री वाणी, धुळे
३. कार्यशाळेमुळे उत्साह वाढून शक्ती मिळाली. – गौरव जाधव, धुळे
४. कार्यशाळेच्या माध्यमातून संघटनाची आवश्यकता लक्षात आली. हिंदु जनजागृती समितीचे कार्य म्हणजे ‘बोले तैसा चाले त्याची वंदवी पावले’, या उक्तीप्रमाणे आहे. – श्री. सुमित परदेशी, नंदुरबार
५. समितीचे व्यापक स्तरावरील कार्य समजले. – पायल नेवे, यावल, जळगाव