संपादकीय
अभिनेत्री अनघा भोसले यांनी मनोरंजन सृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मनोरंजन सृष्टी सोडून त्या आता आध्यात्मिक क्षेत्राकडे वळणार आहेत. स्वत:च्या ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावर त्यांनी हा निर्णय घोषित केला आहे. त्यांनी त्यांच्या खात्यावर त्यांच्या चाहत्यांसाठी केलेल्या लिखाणात काही महत्त्वाची विधाने केली आहेत. ‘मी फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. माझ्या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि मला साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणे योग्य आहे. माझ्यासाठी ईश्वर नेहमीच दयावान राहिला आहे. आपण ज्या उद्देशाने जन्म घेतला आहे, ते उद्दिष्ट पूर्ण करणे, हे आपल्या सगळ्यांचे दायित्व आहे. सगळ्यांनी ईश्वराची इच्छा आणि प्रेम समजून घेतले पाहिजे. मला वाटते, तुम्हाला कुठले उत्तर हवे असेल, तर ते भगवद्गीतेतून मिळवू शकता.’
अभिनेत्री अनघा भोसले यांनी त्यांच्या पोस्टमधून बरीच सूत्रे स्पष्ट केली आहेत. एका मराठी अभिनेत्रीने आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी ऐन तारुण्यात आणि यशस्वी असतांना मनोरंजन सृष्टी सोडण्याचे हे बहुधा पहिलेच उदाहरण असावे. ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘मी स्वत: सडपातळ असूनही पडद्यावर सडपातळ दिसण्यासाठी माझ्यावर दबाव असे आणि त्याचा माझ्या मनःस्वास्थ्यावर परिणाम झाला होता.’ मनोरंजन सृष्टीत झगमगाट दिसत असला, तरी प्रत्यक्षात तेथे किती विविध प्रकारच्या समस्यांचा सामना अभिनेत्री, अभिनेते यांना करावा लागतो, याची कल्पना येते. यातून मानसिक त्रास होऊन व्यक्ती निराशेत जाते; म्हणजे पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळूनही व्यक्ती दु:खीच रहाते. गत २ वर्षांच्या कालावधीत मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध व्यक्तींनी केलेल्या आत्महत्यांमधून याची पुष्टी मिळते. या व्यक्तींनी केलेल्या आत्महत्यांच्या कारणांविषयी स्वतंत्र लिखाण करता येईल; मात्र येथे विषय आल्याने त्यांचा उल्लेख केला.
साधना केल्यामुळे आनंदप्राप्ती होते. यामुळे साधकाचे जीवनच पालटून जाते; मात्र गत काही दशकांमध्ये त्याविषयी शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांमध्ये कुठेच शिक्षण न मिळाल्याने त्याविषयी बहुतांश लोकांमध्ये एक प्रकारची हीनपणाची भावना असते किंवा अपसमज असतात. परिणामी स्वत:हून या मार्गाकडे वळणार्या व्यक्ती या विरळाच असतात. पूर्वपुण्याईने किंवा पूर्वापार या मार्गात असणार्यांचा प्रश्न नाही; मात्र परिस्थिती आणि मानवी जीवनाचे मोल जाणून येथे वळण्याचा निर्णय घेण्यासाठी बुद्धीचा निश्चय अन् श्रद्धाच लागते, हे येथे लक्षात घ्यायला हवे. तसेच असा निर्णय घेणार्यांची हेटाळणी करण्याऐवजी त्यांचे कौतुकच व्हायला हवे.