अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाची ४१० मिनिटे वाया; २ कोटी ८८ लाख रुपयांची हानी !

सत्ताधारी आणि विरोधक यांनी वाया गेलेला वेळ आणि आर्थिक हानी यांचा गांभीर्याने विचार करायला हवा ! – संपादक 

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार

मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २५ मार्च या कालावधीत येथे पार पडले. राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय अधिवेशनात घेण्यात आले आहेत. विरोधकांनी कामकाजात घातलेला गोंधळ आणि अन्य कारणांमुळे सभागृहाचा वेळ ६ घंटे ५० मिनिटे (४१० मिनिटे) इतका वाया गेला. या अधिवेशनात विरोधकांनी फारसे अडथळे न आणल्यामुळे कामकाज बर्‍यापैकी झाले; मात्र तरीही या अधिवेशनात वाया गेलेल्या कामकाजाच्या घंट्यांमुळे २ कोटी ८८ लाख रुपयांची हानी झाली आहे, असा अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केला आहे.

प्रत्येक मिनिटाचा व्यय ७० सहस्र रुपये !

अधिवेशनात विधानसभेत एकूण झालेल्या बैठकीची संख्या १५ आहे. प्रत्यक्षात कामकाज १०६ घंटे ३० मिनिटे इतके झाले. प्रतिदिनचे सरासरी काम ७ घंटे १० मिनिटे झाले आहे. प्रारंभी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्यामुळे काही दिवस सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत कामकाज करण्यात आले. अधिवेशनाच्या कामकाजाचा प्रत्येक मिनिटाचा व्यय हा ७० सहस्र रुपये इतका आहे.

आमदारांची सभागृहातील उपस्थिती !

विधानसभेत आमदारांची ९१.५३ टक्के इतकी सर्वांत अधिक उपस्थिती होती. अगदी अल्प उपस्थिती ६३.३० टक्के नोंदवली गेली. एकूण सरासरी उपस्थिती ८४.३८ टक्के इतकी होती. विधानसभेत १३ शासकीय विधेयके मांडण्यात आली आणि अन्य १५ शासकीय विधेयके संमत करण्यात आली आहेत.

विधीमंडळात झालेले कामकाज !

विधीमंडळात ६ सहस्र ६९८ तारांकित प्रश्न मांडण्यात आले. त्यापैकी ६९६ प्रश्न स्वीकृत करण्यात आले, तर सभागृहात ६४ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. १ सहस्र ७८७ लक्षवेधी सूचना सभागृहाला प्राप्त झाल्या आहेत. त्यांपैकी २७४ सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत, तर ८० लक्षवेधी सूचनांवर सभागृहात चर्चा झाली.

नियम ९७ च्या सूचनांवर चर्चा नाही !

सभागृहात नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेसाठी ६८ सूचना प्राप्त झाल्या होत्या; मात्र त्यांपैकी एकही सूचना नाकारण्यात आली नाही किंवा एकाही सूचनेवर सभागृहात चर्चा झाली नाही, तसेच प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचनांसाठी अर्धा घंटा चर्चेसाठी ७३ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी ६३ सूचना स्वीकारण्यात आल्या; मात्र एकाही अर्धा घंटा चर्चेच्या सूचनेवर चर्चा झाली नाही. सार्वजनिक महत्त्वाच्या गोष्टींवर १८८ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी ३२ सूचना स्वीकारण्यात आल्या; मात्र केवळ ६ सूचनांवर चर्चा झाली.