श्रीगुरूंची आज्ञा म्हणून घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करणार्‍या पुणे जिल्ह्यातील साधिका

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

‘आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येकानेच स्वतःच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करावी’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने सनातनने वर्ष २०२१ च्या कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू केली आहे. यामध्ये ‘नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी लागवड कशी करावी’, याविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या संकेतस्थळावर प्रात्यक्षिकांसहित दिली आहे. यांसह ‘ऑनलाईन’ शिबिरांच्या माध्यमातूनही मार्गदर्शन केले जाते. या मोहिमेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील साधकांनी ‘स्वतःच्या घरी लागवड करणे’, ही श्रीगुरूंची आज्ञा आहे, असा भाव ठेवून पुष्कळ चांगले प्रयत्न केले. यातील काही साधकांचे अनुभव आज पाहूया.

सौ. कल्पना यंदे यांनी घरी लागवड केलेले अळू
सौ. कल्पना यंदे यांनी घरी लागवड केलेली मेथी

१. सौ. कल्पना यंदे, जुन्नर

सौ. कल्पना यंदे

१ अ. लागवडीसंबंधी सेवेला आरंभ केल्यावर कृतज्ञताभाव जागृत होणे : घरी भाजीपाला लागवड करण्यासाठी माती, कुंड्या इत्यादी साहित्य जमवायचे होते. त्यासाठी प्रार्थना करून आरंभ केला. एका साधकांच्या शेतात माती आणण्यासाठी गेले, तेव्हा मातीविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘या मातीमुळे आपल्याला अन्न मिळते’, याची जाणीव झाली. यापूर्वी असे कधीच जाणवले नव्हते. शेतातून घरापर्यंत माती आणण्यासाठी साधकांनी, तसेच यजमानांनी साहाय्य केले. त्या वेळी श्रीगुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१ आ. साधिकेने स्वतःच्या घरी केलेली लागवड : मेथी, शेपू, करडई, पालक, कोथिंबीर, मुळा, कारले, दोडका, घोसाळे, भेंडी, गवार, दुधी भोपळा, वांगी, मिरची, अळू इत्यादी जवळजवळ २० प्रकारच्या भाज्या लावल्या. यांसह गोकर्ण, लिली, जास्वंद आणि शेवंती या फुलझाडांची, तसेच कोरफड, गवती चहा, बेल आणि तुळस या औषधी वनस्पतींची लागवडही केली. लागवड केल्यापासून काही दिवसांतच एक मोठी जुडी होईल, एवढी मेथीची भाजी मिळाली. आता आम्हाला नियमितपणे थोडीफार भाजी मिळत आहे. घरची ताजी भाजी खातांना पुष्कळ चांगले वाटते.

१ इ. रोपांवर आध्यात्मिक स्तरावरील उपायही करणे : भाजी लावतांना नामजप आणि प्रार्थना करणे, कुंड्यांभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालणे, विभूती फुंकरणे, पाणी देतांना त्यात थोडे गोमूत्र घालणे असे आध्यात्मिक स्तरावरील उपायही देवाने करवून घेतले. आता मी नियमित सकाळी झाडांना पाणी घालतांनाही प्रार्थना करते. रोपांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ‘रोपे आपली वाट पहात आहेत’, असे जाणवते, तसेच रोपांविषयी प्रेमभाव जाणवतो.

२. सौ. जानकी पवळे, चंदननगर

सौ. जानकी पवळे

२ अ. भाजीपाला लागवड : आरंभी मी पालेभाज्या, तसेच घरातील मोड आलेले कांदे लावले. या कांद्यांची पात ३ वेळा भाजीसाठी वापरता आली. धने पेरले. त्याची छान कोथिंबीर आली. ती २ – ३ वेळा वापरली. मेथीची भाजी चांगली उगवली. मिरच्याही आल्या. बटाटे लावले आहेत. थोडे लसूणही लावले होते. तेसुद्धा चांगले वाढले आहे. पालक, पुदीना, मुळा, वाल या भाज्याही चांगल्या झाल्या आहेत.

२ आ. औषधी वनस्पती आणि फुलझाडे यांची लागवड : गुळवेल आणि तुळस या औषधी वनस्पती लावल्या. तुळशीचे बी जमवले. पांढरी आणि गुलाबी सदाफुली, तसेच लाल जास्वंद ही फुलझाडे पुष्कळ छान फुलली आहेत.

३. श्रीमती हेमलता चव्हाण, भोर

श्रीमती हेमलता चव्हाण

३ अ. झाडांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर त्यांना फुले येऊ लागणे : गच्चीवर कुंडीत फुलझाडे लावली होती; पण त्यांची वाढ न होणे, फुले न येणे, झाडे सुकणे असे होत होते. यांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून पाण्यात विभूती, गोमूत्र अर्क आणि कापूर घालून ते पाणी रोपांना घातले. पाणी घालतांना नामजप करत ‘गुरुमाऊलीच्या चरणांचे तीर्थ रोपांना घालत आहे’, असा भाव ठेवला. या कृती केल्यावर जास्वंद, झेंडू, कुंदा आणि मोगरा यांना पालवी फुटून काही दिवसांनी फुले आली.

३ आ. स्वतः लागवड करून इतरांनाही लागवडीसाठी प्रोत्साहन देणे : गच्चीवर आणि भिंतीच्या आधारे पानफुटी, पुदीना, लिंबू, गुळवेल, पानवेल (विड्याच्या पानांची वेल) यांसारख्या औषधी वनस्पती लावल्या आहेत. त्यांची वाढ चांगली होत आहे. सनातनच्या संकेतस्थळावरील श्रीमती ज्योती शहा यांचे जीवामृताचे प्रात्यक्षिक पाहून जीवामृत बनवले आणि अन्य साधकांनाही यासाठी प्रोत्साहित केले.’

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

साधकांना लागवड करतांना आलेले अनुभव, लागवडीसंबंधी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यांविषयीचे लिखाण स्वतःच्या छायाचित्रासहित पुढील पत्त्यावर पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संगणकीय पत्ता : [email protected]