श्री. योगेश सोवनी यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, या प्रयोगाच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘तबलावादक श्री. योगेश सोवनी (‘अलंकार’) यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, या संशोधनात्मक प्रयोगाच्या वेळी संगीत अन् नृत्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

२९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत तबलावादक श्री. योगेश सोवनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. त्या वेळी ‘त्यांच्या तबलावादनाचा आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या काही साधकांवर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्यांच्या तबलावादनाचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांच्या वेळी त्यांनी विविध पेशकार, कायदे, रेला, बंदिशी (टीप) तबल्यावर वाजवल्या. त्या वेळी उपस्थित असलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या त्रासदायक अन् चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

२५.३.२०२२ या दिवशीच्या अंकात या अनुभूतींचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

२. श्री. योगेश सोवनी (तबला) आणि श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) (सतार) यांच्या एकत्रित वादनाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

श्री. योगेश सोवनी
श्री. मनोज सहस्रबुद्धे

२ अ. त्रासदायक अनुभूती

१. मला त्रास देणारी अनिष्ट शक्ती माझ्या मनात वाईट विचार आणि अपशब्द घालत होती; पण ते शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडत नव्हते. अनिष्ट शक्ती मला संगीताचा आनंद घेऊ देत नव्हती. – सौ. भक्ती कुलकर्णी (संगीत अभ्यासिका), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

२ आ. चांगल्या अनुभूती

१. सतार आणि तबला यांचे एकत्रित वादन चालू झाल्यावर दोघांच्या वादनातून वातावरणात आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असल्याचे जाणवून उत्साहाचे प्रमाण हळूहळू वाढत गेले.

२. वादन द्रुत (जलद) लयीमध्ये होत असतांना आनंदाने अंगावर रोमांच येत होते.

३. ‘हे वादन दैवी आहे’, असे वाटून ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटत होते. वादनाच्या अंती ‘श्री सरस्वतीदेवीही या ठिकाणी उपस्थित आहे आणि तीच सतार वाजवत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मला ‘मोराप्रमाणे आनंदाने नाचावे’, असे वाटत होते.

(‘यमन हा राग उत्साहदर्शक आणि शृंगारिक राग असल्यामुळे साधिकेला वरील अनुभूती आली.’ – संकलक)

– कु. मयुरी आगावणे (संगीत अभ्यासिका), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

४. वादन ऐकतांना आनंद जाणवत होता. – सौ. भक्ती कुलकर्णी

५. सतारीवर यमन राग चालू असतांना ध्यान लागत होते. – सौ. सावित्री इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासिका), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

३. श्री. मनोज सहस्रबुद्धे (सतार), श्री. योगेश सोवनी (तबला) आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई (तबला) यांच्या एकत्रित वादनाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

अ. तिघांचेही वादन ऐकतांना हे वादन भूलोकात चालू नसून देवलोकात चालू असल्याचे जाणवले. – सौ. अनघा जोशी (बी.ए. संगीत), (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

आ. भैरवी रागाच्या वेळी वातावरणात आनंदाचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले आणि ‘हे वादन संपूच नये’, असे वाटत होते.

इ. त्या वेळी माझे ध्यान लागत होते. दोघे तबल्यावर एकत्रित साथ करत असतांना माझ्या आनंदामध्ये वाढ झाली होती.’

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई, (संगीत विशारद (तबला)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

ई. या वेळी माझे मन शांत होऊन काही काळ गाढ ध्यान लागले होते. – सौ. सावित्री इचलकरंजीकर

४. श्री. योगेश सोवनी यांच्या समवेत तबल्याचे विविध प्रकार वाजवतांना श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांना आलेल्या अनुभूती

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

४ अ. ‘कायदे’ वाजवतांना आलेल्या अनुभूती

१. ३०.१२.२०२१ या दिवशी श्री. योगेश सोवनी आणि मी ‘कायदे’ एकत्र वाजवायचे ठरल्यावर ‘कोणते कायदे वाजवू शकतो ?’, हे देवाच्या कृपेने माझ्या डोळ्यांसमोर आपोआप येत होते. त्यासाठी मला पुष्कळ विचार करावा लागला नाही.

२. एरवी विविध कायदे वाजवतांना त्यासाठी लय पकडतांना कठीण जाते; पण आम्ही एकत्र वादन करत असलेल्या सर्व कायद्यांची लय जशी पाहिजे, तशी मिळत होती. त्या वेळी ‘कोणत्या लयीमध्ये कोणता कायदा वाजवू शकतो, हे देवच मला सांगत आहे’, असे मला जाणवले.

३. कायदा वाजवतांना आनंद जाणवत होता. ‘तबल्याच्या नादातून आनंद वातावरणात पसरत आहे’, असे मला जाणवले.

४ आ. ‘रेला’ वाजवतांना आलेल्या अनुभूती

१. रेला वाजवतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. त्यामुळे मला ‘तबला वाजवणे थांबवू नये’, असे वाटत होते.

२. ‘तबल्यावर काय वाजवणार ?’, हे व्यासपिठावर बसल्यावरच ठरत होते. ‘वाजवतांना देवच सर्व सुचवत आहे’, असे मला जाणवत होते.

३. त्यांच्या समवेत तबला वाजवायचे ठरल्यावर ‘गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) वाजवून घेणार आहेत’, असे मला वाटत होते. त्यामुळे मला ताण आला नाही.  (समाप्त)

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई (२५.१.२०२२)

टीप

१. पेशकार : तबलावादनातील बहुतेक सर्व बोलांच्या साहाय्याने विविध लयी आणि वजने (ठराविक लयीमध्ये केलेला आघात) यांच्या आधारे वादकाच्या प्रतिभेतून फुलत जाणारा तालबद्ध अन् तबलावादनात प्रारंभी वाजवला जाणारा प्रकार म्हणजे ‘पेशकार’.

२. कायदा : तालाच्या मूळ स्वरूपानुसार सिद्ध केलेली विशिष्ट बोलसमुहाची नियमबद्ध अन् विस्तारक्षम रचना म्हणजे कायदा. हा स्वतंत्र तबला-वादनातील मुख्य प्रकार आहे. ‘कायदा’ हा विलंबित आणि मध्य या लयीत (दुगुण किंवा चौगुण यांत) वाजवला जातो.

३. रेला : अत्यंत द्रुत लयीत वाजवला जाणारा, नियमबद्ध, विस्तारक्षम आणि नादांची साखळी निर्माण करणारा बोलसमूह म्हणजे ‘रेला’.

४. बंदीश : निसर्गातील विविध घटनांच्या गतीची (चालीची) अनुभूती देणारी तबल्याच्या भाषेतील काव्यमय रचना म्हणजे बंदीश.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक