सत्यामागील विद्वेष !

मध्यप्रदेश येथील आय.ए.एस्. अधिकारी आणि मध्यप्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपसचिव नियाज खान (डावीकडे) यांना या चित्रपटामुळे पोटशूळ !

कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चर्चेत आहे. कुणी त्याचे समर्थन करत आहे, तर कुणी त्याच्या विरोधात आहे. कुणी ‘अशा चित्रपटांची आवश्यकता होती’, असे म्हणतो, तर कुणी हा चित्रपट पाहून घरी जाणार्‍या हिंदूंना मारहाण करतो. चित्रपटाने बक्कळ कमावलेल्या पैशांवरही काही धूर्त लोकांचा डोळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटाविषयी कौतुकोद्गार काढल्यावर अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत ! त्यानंतर स्वत:च्या चित्रपटांची हानी होऊ नये; म्हणूनही काही मान्यवरांनी ‘चित्रपट कसा चांगला आहे’, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. काश्मीरद्वेष आणि हिंदुद्वेष नसानसांत भिनलेले, तसेच धर्मांधांचा पुळका येणारे असे लोक चित्रपटविरोधी हत्यार उपसत आहेत. प्रतिदिन कुणाचे ना कुणाचे विरोधी विधान समोर येत आहे. मध्यप्रदेश येथील आय.ए.एस्. अधिकारी आणि मध्यप्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपसचिव नियाज खान यांना या चित्रपटामुळे पोटशूळ उठला आहे. खान यांनी ट्वीटद्वारे म्हटले, ‘‘द कश्मीर फाइल्स’मध्ये ज्याप्रकारे काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे निर्मात्यांनी देशातील मुसलमानांच्या हत्यांवरही चित्रपट काढायला हवा. मुसलमान बांधवही या देशाचे नागरिक आहेत, याचे भान सर्वांनी बाळगायला हवे.’’ अर्थात् या वक्तव्यासाठी राज्य सरकारकडून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे. ‘जर मुसलमान बांधव या देशाचे नागरिक आहेत, तर त्यांतील बहुतांश जण खरोखर नागरिकांप्रमाणे वर्तन करतात का ?’ हाही प्रश्नच आहे.

अतार्किक विधाने !

मध्यंतरी नियाज खान म्हणाले होते, ‘‘मी मुसलमानांच्या नरसंहाराविषयीही पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहे. त्यामुळे या धर्तीवर ‘द कश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट काढता येईल. त्यातून अल्पसंख्यांकांचे दुःख आणि वेदना देशवासियांसमोर येतील.’’ खरे पहाता हिंदूबहुल देशात आजवर केवळ आणि केवळ हिंदूंचाच नरसंहार झाला होता अन् अजूनही त्यांच्या हत्या होत आहेत. याचे अनेक पुरावे सर्वत्र उपलब्ध आहेत. हे सर्व कोण करत आहे, हेही सर्वश्रुत आहे. मधोमध काश्मिरी पंडितांना ठेवून त्यांच्या चोहोबाजूंनी धर्मांध आतंकवाद्यांनी त्यांचे निर्घृण हत्याकांड केले. अशा अनेक घटना आहेत. धर्मांधांच्या रक्षणासाठी तर पोलिसांसह भारतातील सर्वच यंत्रणा तैनात असतात. मग त्यांचा नरसंहार होईलच कसा ?

‘मुसलमानांचा नरसंहार झाला’, असे काही वेळ आपण गृहीत धरूया. जर तसे झाले असेल, तर मग ‘भारतात त्यांची लोकसंख्या कशी वाढत आहे ?’, ‘जागोजागी त्यांची दुकाने का थाटली गेली ?’, ‘त्यांच्या वस्त्या, त्यांच्या शाळा अन् महाविद्यालये हे सगळे कसे निर्माण झाले ?’ हे सर्व पहाता ‘मुसलमानांचा नरसंहार’ ही संकल्पना तरी अस्तित्वात आहे का ? या प्रश्नांची उत्तरे प्रथम नियाज खान यांनी द्यावीत. मगच चित्रपट काढण्याची भाषा करावी. ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ असा प्रकार करू नये. मुसलमानांच्या भावनांना हात घालून स्वधर्माचा उदोउदो करण्याचा नियाज यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य कधीच नष्ट होऊ शकत नाही, हे खान महाशयांनी लक्षात घ्यावे ! आज जनतेने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेले आहे; कारण जनता सत्य जाणून आहे. ती सूज्ञ आहे आणि अशा चित्रपटामुळे जनता अधिक सतर्क झाली आहे. मध्यंतरी नियाज खान यांनी स्वतःच्या आडनावाविषयी विधान करून जनतेच्या धार्मिक भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘‘मी ‘खान’ असल्यामुळे मला पुष्कळ काही सहन करावे लागले. ‘खान’ हे आडनाव भुताप्रमाणे माझा पाठलाग करत आहे.’’ अशी विधाने करून ते मुसलमानांविषयी पुळका निर्माण करू पहात आहेत. खरेतर भारतात ‘खाना’वळींची विशेष बडदास्त ठेवली जाते, हे नियाज खान यांना ठाऊक नाही का ? नियाज खान यांच्या एका कादंबरीवर ‘आश्रम’ ही वेबसीरिज बनवण्यात आली होती; परंतु तिच्यामध्ये त्यांना कोणतेही श्रेय न मिळाल्याने त्यांनी ‘आश्रम’चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याविरोधात खटला प्रविष्ट केला होता. हिजाबला प्रोत्साहन देण्याविषयीचे विधान खान यांनी मध्यंतरी केले होते. तेव्हाही त्यांना विरोध झाला होता.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळालेले कोट्यवधींचे यश खान महाशयांच्या डोळ्यांत खुपले. ते म्हणाले, ‘‘चित्रपटाची कमाई १५० कोटी रुपये इतकी झाली आहे, तर ती ब्राह्मण मुलांचे शिक्षण आणि त्यांची घरे यांसाठी दिली, तर मीसुद्धा चित्रपट निर्मात्याचा आदर करीन. हे मोठे दान असेल.’’ दानाची भाषा कोण करत आहे ? इतरांना दानाचा उपदेश करणार्‍यांनी आपण स्वतः किती दानशूर आहोत, हे पडताळून घ्यावे. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाचा पैसा अभिनेते शाहरुख खान पीडित मुसलमानांना देणार आहेत का ?, ‘रुस्तम’ चित्रपटातून मिळालेला पैसा अभिनेता अक्षयकुमार भारतातील नौदलाला देतील का ?’, याचसह आतापर्यंत भारतीय नागरिकांचा कररूपी पैसा हज यात्रेला अनुदान देण्यासाठी वापरण्यात आला. तो नागरिकांना परत मिळेल का ?, या सर्व प्रश्नांची उत्तरे नियाज खान यांच्याकडे आहेत का ? दुसरी गोष्ट म्हणजे ‘खाना’वळींकडून आदराचे स्थान मिळवण्यास हिंदूंना स्वारस्य नाही. हिंदु धर्मीय त्यांच्या कृतीतून समाजात आदराचे स्थान मिळवण्यास सक्षम आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी हे दाखवून दिले आहे. चित्रपटातून धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याने धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करून स्वतःची वाईट बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. अर्थात् ही विधाने अतार्किकच आहेत. प्रत्येक वेळी हिंदूंकडून अपेक्षा न करता ‘आतापर्यंत हिंदूंच्या करण्यात आलेल्या लुटीची लवकरात लवकर परतफेड करावी’, अशी अपेक्षा अन् तिची पूर्तता नियाज खान यांनी धर्मबांधवांकडून करावी ! मगच त्यांचा आदर करावा कि नाही, ते हिंदू ठरवतील.