आमदारांना एकाच कालावधीसाठी निवृत्तीवेतन दिले जाणार ! – पंजाब सरकार

मुळात लोकप्रतिनिधींचा कालावधी केवळ ५ वर्षांचा असतो आणि त्यांना निवृत्तीवेतन मात्र पुढे आजन्म मिळत रहाते, तसेच नंतर ते त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते, हेच मुळात बंद होणे आवश्यक आहे. एखाद्या सरकारी कर्मचार्‍याला २० वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीवेतन मिळते त्या तुलनेत केवळ ५ वर्षे आमदार असूनही त्यांना आजन्म निवृत्तीवेतन कसे मिळते ? – संपादक

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान

चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी राज्यात आमदारांना एकदाच निवृत्तीवेतन मिळणार असल्याचे घोषित केले आहे. यापूर्वी जितक्या वेळी आमदार म्हणून निवडून येईल, तितक्या वेळा निवृत्तीवेतन मिळत होते. म्हणजे ५ वेळा निवडून आला असेल, तर ५ वेळा निवृत्तीवेतन दिले जात होते.

मुख्यमंत्री भगवंतसिंह मान म्हणाले की, या आमदारांना ४ लाख, ५ लाख निवृत्तीवेतन मिळत आहे. जे पूर्वी खासदार होते आणि नंतर आमदारही झाले. त्यांना दोन्ही निवृत्तीवेतन मिळते. आता मात्र ते कितीही वेळा आमदार झाले, तरी त्यांना आता एकाच वेळेसाठी निवृत्तीवेतन दिले जाईल, तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या निवृत्तीवेतनामध्येही कपात केली जाईल.