|
मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – पुणे शहरातील कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे शहरात प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेण्यात येईल. पुणे शहरातील ३०० टन कचरा उचलण्यामागे ठेकेदारांच्या कामात अनियमितता आढळून येत असेल, तर त्याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी पुणे शहरातील कचर्याची समस्या आणि त्यापासून होणारे प्रदूषण यांविषयीची लक्षवेधी विधानसभेत मांडली. त्यावर ते उत्तर देत होते.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, पुणे शहरात प्रतिदिन २ सहस्र २०० टन कचरा सिद्ध होतो. यातील १ सहस्र २०० टन कचरा सुका, तर ९०० टन कचरा ओला आहे. २ सहस्र २०० टन कचर्यापैकी १ सहस्र ७०० टन कचर्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते; मात्र उर्वरित ५०० टन कचरा शहरात इतरत्र ठिकाणी टाकला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे पुणे शहरात प्रदूषण वाढून पर्यावरण, तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा वाहतुकीसाठीची ३०० वाहने कालबाह्य असून नियुक्त ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नाहीत.
यावर राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, शहरात कचरा इतरत्र पडत असला, तरी प्रदूषण वाढून आजारात वाढ झालेली नाही. २ सहस्र २०० पैकी ३०० टन कचर्यावर प्रक्रिया केली जात नाही. त्यासाठी पुणे महापालिकेला सूचना केली जाईल. मी पुणे येथे भेट देऊन कचर्याच्या प्रश्नावर आमदारांसमवेत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावीन.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ‘मुंबईत ४ सहस्र ५०० मेट्रिक टन कचर्यावर प्रकिया केली जात नाही. त्यामुळे त्याची चौकशी करणार का ?’, असा प्रश्न विचारला, तेव्हा ‘माहिती घेऊन चौकशी केली जाईल’, असे बनसोडे यांनी सांगितले.