परिवहनमंत्र्यांनी निवेदन न केल्याने विधान परिषदेत विरोधक आक्रमक !
मुंबई, २२ मार्च ( वार्ता.) – अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला केवळ ३ दिवस शिल्लक असतांना राज्यात चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या कालावधीत एस्.टी. कर्मचार्यांच्या आत्महत्या चालू असूनही एस्.टी. कर्मचार्यांच्या संपावर तोडगा काढला जात नसल्याविषयी विधान परिषदेत संताप व्यक्त केला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्याला साथ देत ‘संपावर तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही’, असा आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी सभागृहात निर्माण झालेल्या स्थितीमुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज प्रत्येकी १० मिनिटांसाठी २ वेळा स्थगित केले.
एस्.टी. कर्मचार्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सभापतींच्या निर्देशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांची एस्.टी. कर्मचारी संघटनांसमवेत बैठक झाली. याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. येत्या २-३ दिवसांत याविषयी निवेदन करणार असल्याचे सांगूनही अनिल परब यांनी सभागृहाला माहिती न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. याविषयी अनिल परब यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून २३ मार्चपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.