ऑस्ट्रेलियाने भारताला परत दिल्या भगवान विष्णु, शिव आणि जैन पंथ यांच्या चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती !

देवतांच्या प्राचीन मूर्ती चोरीला जाऊ नयेत, यासाठी सरकार आतातरी ठोस पावले उचलणार का ? – संपादक

प्राचीन मूर्तींचे निरीक्षण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारतातून चोरी झालेल्या २९ प्राचीन वस्तू ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणण्यात आल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने देवतांची चित्रे, मूर्ती आणि शिल्प यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, बंगाल, तेलंगाणा, तमिळनाडू आदी राज्यांतून या वस्तू चोरीला गेल्या होत्या. त्या संबंधित राज्यांकडे पुन्हा सोपवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्राचीन मूर्तींचे निरीक्षण केले आणि ऑस्ट्रेलियाला यासंदर्भात विशेष धन्यवाद दिले. यांतील काही मूर्ती या इसवी सन् ९ व्या ते १० व्या शतकातील आहेत, तर अन्य मूर्तीही शेकडो वर्षे प्राचीन आहेत. या प्राचीन वस्तूंमध्ये शिव आणि त्यांचे शिष्य, शक्तीची पूजा, भगवान विष्णु आणि त्यांची रूपे, जैन परंपरा, चित्र आणि सजावट करणार्‍या वस्तू यांचा समावेश आहे.