बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

तृणमूल काँग्रेसच्याच दोन गटांतील वादामुळे घटना घडल्याचा आरोप

आपापसांत अशा प्रकारची हिंसा करून लोकांचा जीव घेणारे कार्यकर्ते असणारा पक्ष सत्तेवर असल्यावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेराच वाजणार ! या घटनेवरून आता केंद्र सरकारने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ! – संपादक

घटनास्थळ

बीरभूम (बंगाल) – बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची २१ मार्च या दिवशी हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे काही घरांची जाळपोळ करण्यात आली. यात १० जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले. स्थानिकांचे म्हणणे आहे की, तृणमूल काँग्रेच्याच एका गटाच्या सदस्यांनी जाळपोळ केली; मात्र तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले.

१. बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी २२ मार्च या दिवशी दावा केला की, हिंसाचाराच्या वेळी आग लागली नव्हती. ‘शॉर्ट सर्किट’मुळे लोकांच्या घरांना आग लागली आणि त्यामुळेच काही नागरिकांचा मृत्यू झाला. २१ मार्चला रात्री कोणताही हिंसाचार झाला नाही.

२. अग्नीशमन दलाच्या एका कर्मचार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, त्यांना आगीत किमान १० घरे उद्ध्वस्त झाल्याचे आढळून आले. ‘आम्हाला काही स्थानिक लोकांनी आग विझवण्यापासून रोखले’, असेही या कर्मचार्‍याने सांगितले.

३. आतापर्यंत एका घरातून ७ मृतदेह मिळाले आहेत. ते इतके गंभीररित्या जळाले आहेत की, ते पुरुष, महिला कि अल्पवयीन आहेत ?, हेदेखील समजू शकत नाही. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

४. तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांच्यावर ४ मोटर सायकलस्वारांनी आक्रमण केले होते. या आक्रमणकर्त्यांनी तोंड झाकले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.