म्हाडाची अनुमती न घेता नाशिक महापालिकेने दिल्या गृहनिर्माण योजनेला अनुमती, कोट्यवधींच्या घोटाळ्याची शक्यता !

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची घोषणा !

शासकीय व्यवस्थेत तळागाळात पोचलेला भ्रष्टाचार हे लोकशाहीचे अपयशच होय ! – संपादक

जितेंद्र आव्हाड

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – म्हाडाची अनुमती न घेता नाशिक महानगरपालिकेने काही सदनिकांना अनुमती दिल्या असून पात्र नसलेल्या लोकांना घरे दिली असल्याचा प्रकार उघड झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यामध्ये २०० भूखंडांवर ७ सहस्र सदनिका बांधण्यात आल्या असून त्या म्हाडाकडे हस्तांतरीत केल्या नसल्याचा आरोप केला. या सर्व प्रकार गंभीर असल्याचे नमूद करत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड या संपूर्ण प्रकाराची चौकाशी करण्याची घोषणा केली आहे.

२१ मार्च या दिवशी प्रवीण दरेकर यांनी याविषयीची लक्षवेधी विधान परिषदेत उपस्थित केली होती. याविषयी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दालनात बैठक घेऊन पुढील कारवाईचे धोरण निश्चित करण्याचे, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत आयुक्तांना पदावरून हटवण्याचे निर्देश दिले. या लक्षवेधीला उत्तर देतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘या विषयी संबंधित महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली; मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी म्हाडाच्या अनुमतीविना ७ गृहनिर्माण प्रकल्पांना अनुमती दिली आहे. वर्ष २००७ पासून आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेने ज्या ताकदीने घरे देणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे मिळालेली नाहीत. या प्रकरणात कुणाही अधिकार्‍याला पाठीशी घातले जाणार नाही. गरीबांची घरे लाटणार्‍यांवर कारवाई केली जाईल.’’