सर्वसमावेशक नेतृत्वच काँग्रेसला पुढे घेऊन जाऊ शकते ! – काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा सूर

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर !

  • स्वतःचा पक्षही एकसंध राखू न शकणारी काँग्रेस देश एकसंध काय राखणार ? – संपादक
  • हिंदूंना कायमच दुय्यम दर्जाची वागणूक देणार्‍या काँग्रेसची दुरवस्था झाली, यात काय आश्‍चर्य ! यातून काँग्रेस अजूनही शिकलेली नाही ! त्यामुळे लवकरच ती इतिहासजमा झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक
जी-२३ गटातील नेते गुलाम नबी आझाद (डावीकडे)

नवी देहली – नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने पक्षातील ‘जी-२३’ या बंडखोर गटांच्या काही नेत्यांशी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी प्रथमच चर्चा केली. १६ मार्चच्या रात्री जी-२३ गटातील नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी ही चर्चा झाली. या वेळी मणीशंकर अय्यर, लोकसभेच्या खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर, वर्ष २०१७ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले अन् आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिलेले गुजरातचे नेते शंकर सिंह वाघेला आदी नेते उपस्थित होते.

१. जी -२३ मधील नेत्यांनी बैठकीसंदर्भात प्रथमच अधिकृत पत्रक प्रसारित केले. यात  म्हटले आहे की, आम्हाला असा विश्‍वास आहे की, काँग्रेसला पुढे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग हा सर्वसमावेशक नेतृत्वाचा आहे.

२. पत्रकात पुढे म्हटले आहे की, भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेसला सक्षम करणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसने समविचारी पक्षांशी चर्चा करण्यास आरंभ करावा. तरच वर्ष २०२४ मध्ये जनतेला एक विश्‍वासार्ह पर्याय उपलब्ध होईल.

नेमका काय आहे  काँग्रेसमधील जी-२३ गट ?

वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. त्यानंतर हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आले. पक्षाचे कोणतेही अधिकृत दायित्व नसतांनाही राहुल गांधी हेच पक्षाचे सर्व निर्णय घेत होते. गांधी कुटुंबाच्या पक्ष संघटना चालवण्याच्या पद्धतीला पक्षांतर्गत विरोध होऊ लागला. ‘काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर पक्ष नेतृत्वात आमूलाग्र पालट करावे लागतील’, अशी मागणी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांकडून होऊ लागली. गांधी कुटुंबियांच्या विरोधातील हा सूर जाहीरपणे आळवणार्‍या काँग्रेसचे २३ जणांच्या गटाला ‘जी-२३’ असे म्हटले जाऊ लागले. त्यानंतर काँग्रेसमध्ये ‘गांधी निष्ठावान’ विरुद्ध ‘बंडखोर’ असा वाद वाढत गेला. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर तो विकोपाला गेला आहे.