१. कीव शहराच्या आत घुसून तेथील प्रत्येक इमारतीमधील सैनिकांना मारल्याविना रशियाच्या सैन्याला हे युद्ध जिंकणे कठीण असणे
‘गेल्या ७-८ दिवसांपासून रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या कीव या राजधानीला पूर्ण वेढा दिला आहे आणि त्यांचे रणगाडे सगळीकडे पसरले आहेत. असे असूनही त्यांना कीव कह्यात घेण्यास यश मिळाले नाही. कीव हे ३०-४० लाख लोकसंख्या असलेले एक मोठे शहर आहे. या शहराची व्याप्ती पुष्कळ आहे. त्यामुळे ते कह्यात घेण्यासाठी रशियाच्या सैन्याला शहराच्या आत घुसवून प्रत्येक रस्त्यावर आणि इमारतीमध्ये असलेल्या युक्रेनच्या सैनिकाला मारावे लागेल किंवा त्यांना हुसकवून बाहेर काढावे लागेल. याला सैन्याच्या भाषेत ‘फायटिंग इन बिल्ट अप एरिया’ किंवा ‘अर्बन वारफेअर’, असे म्हटले जाते. याचा त्यांना वापर करावा लागेल.
यासाठी मोठी शस्त्रे, रणगाडे, तोफा, चिलखती वाहने इत्यादींचा फारसा लाभ होत नाही, तर केवळ पायदळाचा वापर करावा लागतो. नेमके हेच करण्यासाठी रशियाच्या सैन्याची सिद्धता दिसत नाही.
१ अ. युक्रेनी लोक खंदक, ट्यूब रेल्वे यांमध्ये बसूनही लढाया लढत आहेत ! : गेल्या काही दिवसांपासून रशियाचे सैन्य मोठ्या प्रमाणात तोफखाना वापरून कीवच्या इमारती उद्ध्वस्त करत आहे. ‘याच्या भयाने युक्रेनचे सैनिक किंवा नागरिक पळून जातील’, असे त्यांना वाटते; परंतु तसे काही झालेले नाही. तेथील इमारतींमधील लोक ही खंदक, ट्यूब रेल्वे यांमध्ये बसूनही लढाया लढत आहेत. जोपर्यंत रशियाचे सैन्य शहराच्या आत घुसत नाही, तोपर्यंत हे शहर कह्यात घेणे त्यांना कठीण आहे.
२. आंतरराष्ट्रीय पातळीवर या युद्धाकडे दुर्लक्ष करण्यात आले, तरी हे युद्ध चालूच राहील !
या युद्धाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळणे आता अल्प झाले आहे. या पारंपरिक युद्धामध्ये ‘माहिती युद्ध’ किंवा ‘मानसिक युद्ध’ हा एक मोठा आयाम होता आणि त्याचा भरपूर वापर करण्यात आला. ‘माहिती युद्धा’द्वारे विशिष्ट प्रकारे माहिती देऊन एखाद्या सैनिकाचे मनोबल न्यून करता येते; पण युद्धाचा मूळ उद्देश प्राप्त करता येत नाही. त्यासाठी पारंपरिक युद्ध लढण्याविना पर्याय नाही. यापूर्वीही मी म्हटले होते की, रशियाची आगेकूच ही अतिशय हळूवार चालू आहे. रशिया ‘आम्ही कितीही वेळ युद्ध लढू शकतो’, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या युद्धाचे अनेकांकडून विश्लेषण करण्यात येत आहे. त्यानुसार रशियाच्या पायदळाचे प्रदर्शन अतिशय वाईट आहे. तसेच ३ वर्षांसाठी रशियाच्या सैन्यात भरती होणार्या सैनिकांचेही प्रदर्शन वाईट आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी शरणागती पत्करण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाच्या सामाजिक माध्यमांत पुतिन यांच्या विरोधात पुष्कळ राग व्यक्त केला जात आहे. रशियाच्या वायूसेनेविषयी तर ‘ते आकाशात येऊन फारशी कारवाई करण्यासाठी सिद्ध नाहीत’, असे मत झाले आहे. एवढे निश्चित की, एका महाशक्तीकडून अपेक्षित होती, तेवढी रशियाच्या सैन्याची गुणवत्ता नाही. हे युद्ध खरोखरच सावकाश चालू आहे. हा त्यांच्या रणनीतीचा भाग आहे कि काही वेगळे आहे, हे कळायला मार्ग नाही; कारण ‘माहिती युद्धा’मध्ये नेमके काय होत आहे, हे नेमके कळत नाही.
२ अ. ‘नाटो’ देश रशियाला तेथे सहजपणे विजय मिळू देणार नाहीत : जागतिक स्तरावर या युद्धाचे महत्त्व जरी न्यून झाले आणि त्याविषयीच्या बातम्या आल्या नाहीत, तरी हे युद्ध चालू राहील. तेथे ‘नाटो’ रशियाला सुखासुखी राहू देणार नाही. पुतिनही एक शक्तीशाली व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते लढाई करतच रहातील. एकीकडे पुतिन यांचे त्यांच्या देशावर पूर्ण नियंत्रण आहे, तर दुसरीकडे ‘नाटो’ युक्रेनला किती दिवस साहाय्य करेल अन् युक्रेनचे सैन्य किती दिवस लढू शकेल यावर या देशाचे भविष्य अवलंबून आहे. पाश्चात्त्य देशांकडून युक्रेनला युद्धसामुग्री मिळणे, तेवढे कठीण नाही. त्यामुळे हे युद्ध प्रसारमाध्यमांच्या कक्षेबाहेर गेले, तरी ते चालूच राहील. हे युद्ध जिंकण्याविना रशियालाही मार्ग नाही, तसेच ‘नाटो’ देशही रशियाला तेथे सहजपणे विजय मिळू देणार नाहीत. त्यामुळे हे युद्ध चालूच राहील आणि त्यात बर्यापैकी हिंसाचार होईल.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे