उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
‘२६.२.२०२२ ते ६.३.२०२२ या कालावधीत सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सेवेनिमित्त पुणे येथे आल्या होत्या. त्या वेळी माझी त्यांच्याशी पुष्कळ कालावधीनंतर भेट झाली. तेव्हा त्या सातारा रस्ता (पुणे) येथे निवासाला होत्या. त्यांच्या सान्निध्यात असतांना मला त्यांच्यात आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे त्या रहात असलेल्या सेवाकेंद्रातील खोलीत दैवी पालट अनुभवण्याची संधी मिळाली.
१. ‘सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्यातील चैतन्यशक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली आहे’, असे जाणवणे
सद्गुरु स्वातीताई अध्यात्मप्रसारानिमित्त सतत भ्रमण करत असतात. त्यांना पुष्कळ ठिकाणी प्रवास करून ठिकठिकाणी सलगपणे मार्गदर्शन करावे लागते, तरीही दुसर्या दिवशी त्या पुन्हा मोठ्या उत्साहाने पुढील ठिकाणी जाण्यासाठी सिद्ध असतात. यातून ‘त्यांच्यातील चैतन्यशक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली आहे’, असे मला जाणवले. या चैतन्यशक्तीमुळे त्यांच्या सान्निध्यात येणारे साधक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा उत्साह पुष्कळ वाढला आहे.
२. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वातीताईंच्या वाणीत क्षात्रतेज जाणवणे अन् साधनेविषयी मार्गदर्शन करतांना त्यांच्या वाणीत वात्सल्यभाव जाणवणे
सद्गुरु स्वातीताई यांच्या वाणीत क्षात्रतेज सातत्याने अनुभवता येते; मात्र आता त्या बोलत असतांना ‘त्यांच्या वाणीतून वात्सल्यभाव आणि प्रीती यांच्या स्पंदनांचा ओघ पुष्कळ प्रमाणात येत आहे’, असे जाणवते. साधक, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना राष्ट्र अन् धर्म यांवरील आघातांविषयी मार्गदर्शन करतांना त्यांच्यातील क्षात्रतेज क्षणार्धात जागृत होते, तर साधनेविषयी बोलतांना त्यांच्या वाणीत पुष्कळ वात्सल्यभाव जाणवतो.
३. महाशिवरात्रीच्या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ व्याख्यानातील चलचित्रामध्ये दाखवलेल्या सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रात त्यांचा तोंडवळा पुष्कळ गुलाबी दिसणे
१.३.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीला सद्गुरु स्वातीताईंनी ‘ऑनलाईन’ व्याख्यानात मार्गदर्शन केले. त्या वेळी चलचित्रावर (‘व्हिडिओ’वर) त्यांचे छायाचित्र दाखवण्यात आले. ‘त्या छायाचित्रात त्यांचा तोंडवळा पुष्कळ गुलाबी दिसत आहे’, असे मला जाणवले. सद्गुरु स्वातीताई यांचे मूळ छायाचित्र आणि महाशिवरात्रीला झालेल्या व्याख्यानातील चलचित्रामध्ये दाखवलेले त्यांचे छायाचित्र, यांची तुलना केल्यावर हा पालट प्रकर्षाने जाणवतो.
४. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये निवासाला असलेल्या खोलीत जाणवलेले पालट
अ. खोलीतील खिडक्यांच्या काचा पुष्कळ पारदर्शक झाल्या आहेत आणि खिडक्यांच्या काचांवर पडणारे प्रतिबिंबही पुष्कळ स्पष्ट दिसते.
आ. खोलीतील लादी पुष्कळ गुळगुळीत झाली आहे.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी सद्गुरु स्वातीताईंच्या सान्निध्यात ४ – ५ दिवस असतांना मला वरील पालट जाणवले. ‘प.पू. गुरुदेवांनी ही आनंददायी अनुभूती मला दिली’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), देवद, पनवेल. (६.३.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |