‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !

पणजी, २६ जुलै – गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांचा समावेश असलेली ‘एकादश तीर्थयात्रा’ योजना चालू केल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने गोवा सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

मंदिर महासंघाने म्हटले आहे की, गोवा म्हटले की, केवळ समुद्रकिनारे, मनोरंजन आणि निसर्गसौंदर्य एवढीच प्रतिमा अनेकांच्या मनात आहे; मात्र गोवा ही भगवान परशुराम यांनी निर्माण केलेली पवित्र भूमी आहे. गोव्यात शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली प्राचीन मंदिरे, समृद्ध धार्मिक संस्कृती, उत्सव, लोकपरंपरा आणि अध्यात्म यांचा अनमोल वारसा आहे. या वारशाची देश-विदेशातील भाविक आणि पर्यटक यांना ओळख करून देण्याच्या दृष्टीने ‘एकादश तीर्थयात्रा’ ही योजना अत्यंत स्वागतार्ह अन् दूरदृष्टीचा निर्णय आहे.

या उपक्रमामुळे गोव्यातील प्रमुख मंदिरांना भेट देणार्‍या भाविकांची संख्या वाढेल, धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, तसेच मंदिरांशी निगडित पारंपरिक कला, संस्कृती आणि स्थानिक रोजगार यांनाही प्रोत्साहन मिळेल. गोव्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची जागतिक स्तरावर प्रभावी ओळख निर्माण करण्यासही या योजनेचा मोठा हातभार लागेल. या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट मंदिरांच्या इतिहासाची माहिती देणारा फलक संबंधित मंदिराच्या ठिकाणी लावण्यात यावा, तसेच भविष्यात गोव्यातील इतर प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांचाही या योजनेत टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात यावा, अशी विनंती महासंघाने केली आहे.