गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांचे सार्वजनिक कार्यक्रमात विधान

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान

भोपाळ (मध्यप्रदेश) – गंगा नदीमध्ये नौकेमध्ये चिकन बिर्याणी खाणे गुन्हा नाही, तो गुन्हा असूही शकत नाही; पण अशी कृती करणार्‍यांना अटक करण्यात आली आणि ३ मास कारागृहात काढावे लागले, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी येथे म्हटले. ते येथील ‘नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी’ येथे न्यायमूर्ती जी.पी. सिंह यांच्या चौथ्या स्मृती व्याख्यानात बोलत होते.

न्यायमूर्ती भुयान पुढे म्हणाले की,

१. स्वतःचे विचार मांडण्याचा आणि शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यामध्ये मोडतो. वाद-विवाद लोकशाहीचा आत्मा आहे; पण अलीकडे सामान्य गोष्टींनाही गुन्हेगारी स्वरूप दिले जाते.

२. पर्यावरणाच्या विनाशावर आंदोलन करणार्‍यांना गुन्हेगारासारखे पिटाळून लावले जाते. महाविद्यालच्या परिसरातच आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना अटक केली जाते.

३. न्यायालये संवेदनशील आहेत आणि जामीन संमतही करतात; परंतु बर्‍याचदा तो विलंबाने मिळतो. जामीन देतांना ज्या जाचक अटी लादल्या जातात, त्या चिंतेचा विषय आहेत. अशा आदेशांमुळे न्यायालयांकडून नागरिकांना निदर्शन न करण्याचा संदेश दिला जात आहे का ?

४. बुलडोझर न्यायाच्या विरोधातील वर्ष २०२४ च्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वागतार्ह होता; परंतु तो २ वर्षे विलंबाने आला.

५. निवृत्तीनंतर माजी न्यायाधिशांनी राजकारणात जाण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करतांना यात वैचारिक दोष असल्याचे न्यायमूर्ती भुयान म्हणाले.

निकालावर टीका, म्हणजे न्यायाधिशांवर टीका नव्हे ! – न्यायमूर्ती भुयान

विद्यार्थ्यांनी न्यायव्यवस्थेसारख्या संस्थांवर प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन न्यायमूर्ती भुयान यांनी केले. ते म्हणाले की, न्यायालयाच्या निकालाचे परीक्षण करावे आणि आवश्यक असल्यास त्यावर टीकाही करावी. एखाद्या निकालावर टीका, म्हणजे न्यायाधिशांवर टीका नव्हे, असेही भुयान यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

सहस्रो वर्षांपासून गंगा ही हिंदूंसाठी देवनदी आहे. तिचा वेद-पुराणांमध्येही उल्लेख आहे. त्यामुळे तिचे पवित्र्य राखले जाणे आवश्यक आहे. दुर्दैवाने अलीकडे गंगा नदीकडे केवळ जलप्रवाह आणि मौजमजेचे ठिकाण म्हणून पाहिले जात असल्याने त्यात कुणी काहीही करू धजावतो. हे हिंदूंना लज्जास्पद !